ही आजच्या मटातली बातमी आहे. : (संदर्भासाठी येथे उतरवून ठेवलेली आहे.)

मूळ बातमी : देशी असो विदेशी... तुम्ही बोला मराठी

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई

राज्याचे मंत्री, प्रशासकीय प्रमुख, विभागप्रमुख यांनी सरकारी, सार्वजनिक कार्यक्रमांत शक्यतो मराठीच बोलावे; इतकेच नव्हे, तर परदेशी सरकारी पाहुणे, प्रतिनिधी यांच्याशीही दुभाषामार्फत मराठीतूनच संवाद साधावा, असा आग्रह राज्य सरकारच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यात धरण्यात आला असून त्यामुळे सरकारी वर्तुळात नवा वाद उभा ठाकण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी स्थापलेल्या समितीने आपला मसुदा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना शुक्रवारी सादर केला. मराठीचा मुद्दा फ्लीट टॅक्सी परवान्यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असताना सादर झालेल्या या मसुद्यात अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. परदेशी पाहुण्यांशी दुभाषामार्फत बोला, ही त्यातलीच एक सूचना. दुभाषांची मदत घेण्याची पद्धत सरकारात रुढ झाल्यास मराठी भाषिकांना अनुवादकाचा व्यवसाय उपलब्ध होईल, असे समितीचे म्हणणे आहे.

राज्य सरकारच्या कार्यक्रमात मंचांवर लावण्यात येणारे माहिती फलक मराठीत असावेत आणि आवश्यकतेनुसार अन्य भाषांत असावेत, सरकारी-निमसरकारी कार्यालये, शाळा-कॉलेजे-विद्यापीठांत मराठीतून सूचनाफलक लावले जावेत, असेही समिती म्हणते. गुजराती भाषेची अकादमी महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली आहे; त्याच धतीर्वर मराठी अकादमी गुजरातमध्ये स्थापण्याची विनंती तेथील सरकारला करावी, तसेच हिंदी राज्यांमध्येही मराठी अकादमी स्थापण्याची विनंती स्थानिक सरकारांना करावी, अशी समितीची शिफारस आहे. मराठी शिकण्याची इच्छा असलेल्या अन्य भारतीय तसेच विदेशी भाषिकांसाठी आवश्यक त्या पाठ्यपुस्तकांची निमिर्ती करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना अर्थसहाय्य द्यावे, अमराठी भाषिकांसाठी व्यवहारोपयोगी मराठी शिकण्याची सोय करून देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना प्रोत्साहन द्यावे, असेही समितीने सुचवले आहे.

...............

च्यायला, आयला नाही... अरेच्चा!

मसुदा समितीने सुचवलेल्या शिफारसी मंजूर झाल्यास महाराष्ट्रातील लोकांना बोलतानाही थोडे सावध राहावे लागेल. बोली भाषेतील शब्द, वाक्प्रचार आदींच्या वापराने सार्वजनिक जीवनात संघर्ष होऊ नये, यासाठी काही शब्द वापरू नये, असे सांगत, समितीने त्याऐवजी कुठले शब्द वापरा, हेही सांगितले आहे. टाळता येणाऱ्या शब्दांची माहिती शिक्षक, पत्रकार, साहित्यिक, कलावंत, राजकीय नेते यांना असावी, यासाठी सूची तयार करण्याची शिफारसही समितीने केली आहे.

कुठल्या शब्दाऐवजी कुठला शब्द

च्यायला, आयला : अरेच्चा, धेडगुजरी : संमिश्र वा संकरित, चांभारचौकशी : नसत्या चौकशा, वेश्या : देहविक्रय करणारी व्यक्ती, बुद्दू : मुर्ख, गावंढळ, खेडवळ : ग्रामीण, खेडूत-बाटगा : धर्मांतरीत, खेळखंडोबा : विचका, मलपृष्ठ :मूलपृष्ठ किंवा नवीन शब्द तयार करणे.