दुवा क्र. १

ओशिवरात 'समर्थ डेव्हलपर्स'चे दीड कोटीचे उद्या

रंगांचा उत्सव नुकताच आटोपलाय. रंगाची एका शब्दात व्याख्या कर असं कुणी सांगितलं तर रंग म्हणजे आनंद असं मी पटकन सांगेन. होळीत रंग उडवताना या आनंदाचा प्रत्यय तुम्हाला आला असेल. रंगाचं वेड मानवाला अनादीकालापासून असावं. आणि ते चिरंतनही असावं. हे वेड कोणत्याही प्रकारे व्यक्त होत राहतं. म्हणून तर रंगीत टीव्ही आल्याबरोबर ब्लॅक ऍन्ड व्हाईट टीव्ही अडगळीत गेले. कलर मोबाईल आल्याबरोबर ब्लॅक ऍन्ड व्हाईट मोबाईल नकोसे वाटू लागले. रंग हा गृहसजावटीचा आद्यभाग बनला. प्रथम रंग कोणता द्यायचा त्यावर चर्चा. फर्निचर वगैरे नंतर. फर्निचर घेण्यासाठी पैसे नसतील तर त्याची खरेदी पुढे ढकलली जाते पण पैसे कमी पडतात म्हणून बिनरंगाच्या घरात कुणी राहायला गेल्याचं माझ्यातरी पाहण्यात नाही.
ऋषीचं कुळ शोधू नये असं म्हणतात. रंगांचा इतिहास खरवडताना या उक्तीचा वारंवार अनुभव येतो. मानवानं पहिल्यांदा रंगाचा वापर केव्हा केला असेल या प्रश्नापुढील प्रश्नचिन्ह मग मोठं मोठं होत जातं. मनाला पटोत न पटोत प्रश्नांची उत्तरं शोधताना ज्ञात इतिहासाचे दाखले घ्यावेच लागतात. प्राचीन काळी खोदलेल्या गुहा, लेणी म्हणजे रंगांच्या ज्ञात इतिहासाचा पुरावा. हजारो वर्षांपूर्वी रंगवलेली अजंठा-वेरुळची लेणी आजही फ्रेश दिसतात. ( तेव्हा वर्षभरापूर्वी १६ हजार खर्चून रंगवलेला फ्लॅट फिका का पडला असा प्रश्न मनात येतोच.) मातीच्या रंगांचा त्या काळी वापर व्हायचा. झाडपाला, बिया आणि फळांचाही वापर व्हायचा. रंग देण्याची उद्दिष्टेही वेगवेगळी असायची. म्हणजे भूताखेतांना दूर ठेवणं, भाग्याला आमंत्रण देणं, आत्म्यांना संतुष्ट करणं वगैरे वगैरे. स्पेनमधील अल्टिमारा आणि फ्रान्समधील लासकॉज येथे रंगवलेल्या गुहा पहिल्यांदा सापडल्या. रंगीत माती व पाण्याचा वापर करून बनवलेले रंग, प्राण्यांच्या चरबीचे बायंडर आणि हातांचे ठसे व काठ्यांचा ब्रशसारखा केलेला वापर हे येथील वैशिष्ट्य. ख्रिस्तपूर्व ३००० वर्षात इजिप्शियन लोकांत घरं रंगवण्याची प्रथा होती. युद्धाचे प्रसंग, धार्मिक प्रसंगांची चित्रं काढून ते घरं सजवित. पिवळा, काळा, लाल, निळा आणि पांढरा या रंगाचा वापर ते करीत. अठराव्या शतकाच्या आसपास टिकाऊ रंगाची गरज लोकांच्या लक्षात येऊ लागली. विसाव्या शतकात तर रंगांच्या दुनियेत क्रांतीच होऊ लागली. रंग आणि रंगांचा वापर यांच्या संकल्पना पॉलिश होऊ लागल्या. नवनवीन प्रकारचे बायंडर्स, सिन्थेटिक पिगमेन्टस, रंग फासण्याच्या नवनवीन पद्धती यामुळे रंगाचं विश्व ढवळून निघालं.
रंगच का?
खरंतर भिंतींना रंगच का द्यायचा असा प्रश्न पडायला हवा. अन्य माध्यमांतूनही भिंती रंगीत करता येऊ शकतील. उदा. भिंतीवर रंगीत कापड, रंगीत कागद चिकटवता येतील. रंगीत सनमायकाचा वापर करता येईल. रंगीत काचा चिकटवता येतील. आणखीही काही कल्पक प्रकार शोधता येतील जेणेकरून खर्च वाचेल. इंटेरियर डिझायनिंगच्या बेफाट, बेफाम आणि विचित्र कल्पनांचा हा काळ आहे. तरीही रंगाला मात्र पर्याय नाही असं का?
मॉडर्न आर्किटेक्चमध्ये घरं बनविली जातात सीमेंट कॉँक्रिट आणि विटांची. सच्छिद्रता हे या दोन्ही गोष्टींचं विशेष. या विशेषामुळे पाणी शोषून घेणं ओघानं आलंच. दोन प्रकारचे दाब काँक्रिटला सहन करायचे असतात. ते म्हणजे कॉम्प्रेस्ड स्ट्रेन आणि टेन्साईल स्ट्रेन. यापैकी कॉम्प्रेस्ड स्ट्रेन सहन करण्याची त्याची क्षमता प्रचंड असते. पण टेन्साईल स्ट्रेन सहन करण्याच्या बाबतीत तो मार खातो. ही क्षमता वाढावी म्हणून त्याच्यात स्टीलचा सांगाडा (रेनफोर्समेंट) टाकावा लागतो.
काँक्रीट मूलतः अल्कली गुणधर्माचं असतं. पण वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड त्याच्यातील अल्कलीशी संयोग पावतं आणि बनवतं कॅल्शियम कार्बेनेट. या संयोगामुळे कॉँक्रीटचा अल्कधर्म कमी कमी होत जातो. परिणामी आतील स्टील एन्फोर्समेंट गंजण्याचा धोका वाढतो. कोरड्या वातावरणात हा धोका कमी असला तरी आपल्यासारख्या दमट आणि प्रचंड पावसाच्या प्रदेशात हा धोका जरा जास्तच असतो. प्लास्टरमधून झिरपणारं पाणी म्हणजे रेनफोर्समेंटचा शत्रू नंबर वन. ते रेनफोर्समेंटला गंजवतं. या गंजाचा आकार फुगत जातो आणि तो प्लास्टरला ढकलू लागतो. मग प्लास्टरला भेगा पडणं, त्याचे टवके उडणं असे प्रकार दिसू लागतात.
हे टाळण्यासाठी एकच उपाय उरतो तो म्हणजे रंग. पाणी आणि कार्बन डाय ऑक्साईड या दोहोंना काँक्रीटमध्ये झिरपण्यापासून रंग रोखतो. त्यामुळे रेनफोर्समेंट गंजण्याचा धोका कमी होतो. एवढंच नाही तर बायोसाईड मिश्रित चांगल्या दर्जाचा रंग बुरशीसारख्या सुक्ष्मजीवांना भिंतीवर वाढू देत नाही. त्यामुळे पावसाळ्यात भिंती शेवाळल्यासारख्या दिसत नाहीत आणि प्लास्टरचंही नुकसान होत नाही.
रंग लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ती म्हणजे रंग हे पृष्ठभागापेक्षा जास्त बलवान नसतात. म्हणून पृष्ठभागात काही दोष असतील तर ते प्रथम काढायला हवेत. मुदलात तुमच्या भिंतीच खराब असतील आणि सब मरीज की दवा एक असं म्हणत तुम्ही रंग फासलात तर दव्याचे पैसे पाण्यात गेलेच म्हणून समजा. भिंती गळत नाहीत, ओलावा पकडत नाहीत, भेगाळलेल्या नाहीत, बुरशी चढलेल्या नाहीत याची खात्री रंग देण्यापूर्वीच करा. यापैकी कोणताही दोष पृष्ठभागात असेल तर तो प्रथम काढून मगच रंगकाम करा. कारण एकदा रंग देऊन झाल्यानंतर भिंतीतील दोष काढणं फारच कटकटीचं आणि खर्चिक असतं. शिवाय दोष कायमचे निघतील याची खात्री नसतेच.
रंगकाम करताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की पृष्ठभाग सुधारण्यासाठी खर्च होणारा वेळ हा प्रत्यक्ष रंगकामाला लागणार्‍या वेळेपेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतो. मात्र हा वेळ वाया गेलेला नसतो. कारण तुमच्या रंगाचं आयुष्य मुख्यतः पृष्ठभागाच्या दर्जावर अवलंबून असतं. याशिवाय धूळ, पाणी, खारी व प्रदूषित हवा, उष्णता आणि सूर्यप्रकाश हे अन्य घटक रंगाचं आयुष्य कमी करतात.