ह्या लेखाच्या निमित्ताने बरेच स्मरणरंजन झाले!
बिनाकाचे आकर्षण त्याकाळी खूपच होते. इतके की माझ्या लहानपणी आमच्या घरी रेडिओ नव्हता तर आम्ही कधीकधी शेजाऱ्यांकडे बिनाका ऐकायला जायचो! अमीन सायानीचे निवेदन हे त्या आकर्षणाचे मुख्य कारण होते. (अमीन सायानीने मेहमूदच्या(?) ’भूतबंगला’ चित्रपटात छोटीशी भूमिकाही केली आहे -म्हणजे ’अमीन सायानी के रोल में अमीन सायानी’ अशा प्रकारची- हे काहींना आठवत असेल.)
हेमंतकुमारने संगीत दिलेले अनुपमातील ’धीरे धीरे मचल’ हे गाणे बरेच आठवडे बिनाकात प्रथम क्रमांकावर होते असे स्मरत आहे. बीस साल बादची गाणीही बिनाकात नक्कीच वाजून गेली असतील असे वाटते. मात्र ओ. पी. नय्यरची गाणी खूप गाजूनही बिनाकात त्यांची वर्णी लागल्याचे ’ऐकिवात’ नाही.
बिनाकाच्या निमित्ताने रेडिओ सिलोनबद्दलच्या आणखीही काही गोष्टी आठवल्या. सिलोनवरील मनोहर महाजन नावाचा निवेदक आम्हाला तेव्हा आवडत असे. सुनील दत्तही पूर्वी सिलोनवर निवेदक होता. अर्थात आम्ही त्याचे निवेदन कधी ऐकले नाही कारण तोपर्यंत तो अभिनेता झाला होता. सिलोनवर चित्रपट संगीताचेच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम -जब आप गा उठें, एक और अनेक- यासारखे असत. जुन्या गाण्यांचेच तीन तरी कार्यक्रम असत. एक ’पुरानी फिल्मोंका संगीत’. तो सकाळी सात (की साडेसात?) ते आठ असा असायचा. त्याची सांगता नेहमी सेहगलच्या गाण्याने होत असे. ते संपता संपता ’लोमा टाइम’ आठ वाजल्याचे सांगत असे! जुन्या गाण्यांचे आणखी दोन कार्यक्रम म्हणजे एक ’हमेशा जवॉं गीतोंका’ आणि दुसरा ’भूले बिसरे गीतों’का.
त्याच काळात कोणत्या तरी केंद्रावर दुपारी अडीचला खूप छान गाणी लागत. केंद्र कोणते ते आम्हाला कळत नसे. पण निवेदक ’ये ऑल इंडिया रेडिओकी उर्दू सर्व्हिस है।’ असे सांगत. आम्ही त्या केंद्रालाच ’ऑल इंडिया’ म्हणायचो! म्हणजे ऑल इंडियावर काल अमुक गाणं लागलं होतं. इत्यादी.
---------
ह्या लेखात आदी नारायण राव आणि एस. एन. त्रिपाठी यांनीही हजेरी लावली हे पाहून बरे वाटले. आदी नारायण राव म्हटले की ’कुहू कुहू’ आठवतेच!
लेखात ज्याला ’रेकॉर्ड लायब्ररी’ म्हटले आहे त्याला मी पुण्याला महाविद्यालयात असताना म्युझिक सेंटर म्हणत. आम्ही मैत्रिणी गाण्यांची यादी घेऊन तिथे जात असू.
असो. लेख वाचून जे आठवले ते सर्व भरताड लिहिले आहे.
लेख आवडला हे वे. सां. न. ल.