@ विक्रम : तुमचा ऐपतीचा मुद्दा मी पुन्हा विचार केल्यावर काय आहे हे माझ्या ध्यानात आला. तुमचे म्हणणे आहे, की जिथे दोन वेळच्या जेवणाची किंवा प्राथमिक गरजा पुऱ्या होण्याची भ्रांत आहे, तिथे वर सुचविलेल्या गोष्टी कशा काय अंमलात आणणार? तर ह्याला पुन्हा उत्तर हेच की तशी मानसिकता व तयारी करायला लागेल. एकदा इच्छा व मनाची तयारी झाली की मार्ग पण सुचत जातो.
मुलांना मोकळ्या हवेत खेळायला पैसे खर्च करायला लागत नाहीत. साधे परंतु ताजे अन्नही त्यांना वेळेत व पुरेसे दिल्यास त्यांची शारिरिक गरज भागते. छंद जोपासतानाही दर वेळेस पैसा खर्च करायला लागत नाही. वाचन, श्रवण, लेखन ह्याव्यतिरिक्त मुले असाही एखादा छंद जोपासू शकतात ज्याचे पुढे रोजगारात रुपांतर होऊ शकते. पालकांना शाळेतील शिक्षकांच्या नियमित संपर्कात राहण्यासाठीही जादा पैसे मोजावे लागत नाहीत. मुलांशी मोकळी चर्चा,  हास्यविनोद, सुसंवाद, गप्पा मारण्यासाठी, त्यांना उत्तम गोष्टी सांगण्यासाठी,  त्यांना उदात्त स्वप्ने - उदात्त आदर्श दाखविण्यासाठी पैसे पडतात का? त्यांना आयुष्याकडे, त्यात येणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवांकडे सकारात्मक
दृष्टीने पाहण्यासाठी पैसे पडतात का? खरे तर त्यासाठी पालक सुशिक्षित असण्याची, आर्थिक सुस्थितीत असण्याचीही गरज नाही. त्यासाठी हवी ती आपल्या मुलांना उत्तम घडविण्याची व त्यांना एक सुजाण नागरिक, एक जबाबदार माणूस बनविण्याची मानसिकता व इच्छाशक्तीच!