अगोदर सोनिया गांधींशी मराठीत बोलून दाखवावे असे आव्हान उद्धव ठाकऱ्यांनी  आपल्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे.  मी तर म्हणतो, त्यांच्यासमोर आधी मराठीत ततपप करून दाखवा, बोलणे नंतर.
कुठल्याही भाषेत अगदी समान अर्थ असलेले दोन शब्द क्वचितच असतात. धेडगुजरी, संमिश्र व संकरित यांच्या अर्थांमध्ये फरक आहे. संमिश्र प्रतिक्रिया, संकरित बियाणे, या शब्दांत 'धेडगुजरी 'वापरून दाखवावा.  बुद्दू माणूस मूर्ख असतोच असे नाही आणि याउलट. मूर्ख बडबड म्हणजे बुद्दू बडबड?
तोच प्रकार गावढळ/गांवढळ(गावंढळ नाही! ), खेडवळ, ग्रामीण, खेडूत या शब्दांबद्दल. गावढळ म्हणजे खेडवळ चालीरीतींचा, खेडवळ म्हणजे गांवढळ चालीरीतींचा नाही!  असे करायला लागलो तर, 'गांवढ्या गावात गाढवी सवाशीण' मध्ये बदल करून 'ग्रामीण भागात गर्दभी सवाशीण' असे संस्कृतीकरण करायला लागेल. ग्रामीण संस्कृती म्हणजे गावढळ संस्कृती?  खेडूत हे नाम आहे, बाकीची विशेषणे आहेत. हे शब्द आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अर्थासहित मराठीत असायला सरकारची हरकत का असावी?
बाटगा आणि धर्मांतरित एक? मग सगळे नवबौद्ध बाटगे झाले. बाटगा म्हणजे धर्मभ्रष्ट, धर्मांतरित हा भ्रष्ट नसतो. 
मलपृष्ठला विरोध, कां? तर मग, मलमलला काय मूलमूल म्हणणार?
सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे.--अद्वैतुल्लाखान