आम्हांला पांचव्या इयत्तेपासून फाऊंटन पेन वापरावें लागलें. हीरो आणि पायलट पेनें आम्हांला अकरावी शालांत परीक्षेच्या वर्षीं मिळालीं. पांचवीसहावीतला एक उद्योग आठवतो. दर रविवारीं सकाळीं पेन धुवून हात निळे करून घ्यायचे आणि कधींतरी सठीसामासीं हळदीचा लगदा लाल पेनला लावून ठेवला तर धुतल्यानंतर ते नारिंगी होत असे आणि काळे पेन हिरवें. मग चार दिवस नवीन पेन असल्याचा भ्रामक आनंद मिळे. हाताला शाईच्या जोडीला हळदीचाही रंग. मी आणि माझा मोठा भाऊ पेनची अदलाबदल करीत असूं. मग कांहीं दिवस नवें पेन वापरल्यासारखें वाटे. कधीं या पेनचे टोपण त्या पेनला तर या पेनचें क्लिप त्या पेनला असेही चाळे चालत. मग आणखी नवेपणा. या भानगडींत माझें पेन नेहमीं गळे तरी किंवा संप तरी पुकारी.
सुधीर कांदळकर