माझ्या मते महागाईमागे वस्तूचा तुटवडा (शॉर्टफॉल) हे एक प्रमुख कारण आहे. तुटवडा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकतो.दुष्काळ,अवर्षण,अतिवर्षा,अकालवर्षा,गारपीट, शीतलहर,अतिउष्णता,टोळधाड, कीड, वादळ, चक्रीवादळ ही नैसर्गिक कारणे तर साठेबाजी,भ्रष्टाचार, धान्य-वाहतुकीतला असमन्वय(रेल्वे वाघिणींची अनुपलब्धता, पंजाबातली गोदामे भरल्यामुळे तिथले धान्य आंध्रामध्ये साठवावे लागण्यासारखे प्रकार, निर्यातीसाठी कंटेनर्सची अनुपलब्धी,बंदरांमधला खोळंबा, जहाजांना बर्थ न मिळणे इ.)माथाडी कामगारांचा संप,जागतिक बाजारपेठेतला पुरवठा आणि मागणी, अदूरदर्शी ,आडमुठ्या व अज्ञानी अश्या स्थानिक संघटनांची अरेरावी (अमुक माल आम्ही बंदरात येऊ देणार नाही किंवा उचलू देणार नाही सदृश आंदोलने) ही मानवनिर्मित कारणे. मूलतः नैसर्गिक रीत्या तुटवडा निर्माण झाल्यावर टंचाई आणि भाववाढ होण्यामधली मानवी कारणांची परिणामकता अधिक वाढते.शिवाय अवेलेबिलिटी आणि अफ़ोर्डेबिलिटी, उपलब्धता आणि परवडण्यायोग्यता हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. उत्पादनखर्च कमी झाला तर अंतिम विक्रीकिंमत कमी होऊ शकते. चीनने कृत्रिमरीत्या उत्पादनखर्च कमी करून दाखवला आहे. धान्याच्या राखीव साठ्यामुळे पुढील एक वर्षाच्या नैसर्गिक तुटवड्यावर मात करता येते. पण सलग दोन-तीन हंगाम नैसर्गिक तुटवड्याचे गेले तर टंचाई निर्माण होते. नाशिवंत माल दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही. इथे नागरी पुरवठा खाते महत्त्वाची भूमिका बजावू शकते. साठेबाजी रोखणे, रेल्वे सारख्या खात्यांशी समन्वय आणि सुसंवाद साधणे यासारखी पावले उचलता येतील. सद्ध्याची महागाई हा माझ्यामते नैसर्गिक तुटवडा आणि थोड्याफार प्रमाणात नागरी पुरवठा खात्याचे अपयश या दोघांचा परिपाक आहे. अर्थात कृषी आणि पुरवठा या दोनही खात्यांचा कार्यभार एकाच मंत्र्यांकडे आहे ही वेगळी गोष्ट.

जाता जाताः   गेल्या आठवड्यात विदर्भातल्या काही जिल्ह्यांत फिरण्याचा योग आला. तेथे तूर ह्या धान्याचे पीक समाधानकारक वाटले. स्थानिकांशी बोलताना तसे जाणवलेही. पाहूया पुढे काय घडते ते!