लेखात तार शब्दाचे वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. त्यातले कित्येक मूलतः समान आहेत. तार म्हणजे अतिबारीक सळी.धातूमधून तार निघण्याच्या गुणधर्माला इंग्रजीमध्ये डक्टिलिटी व धातूला डक्टाइल असे म्हणतात.सोने, चांदी, तांबे हे धातू डक्टाइल आहेत.भेंडीच्या भाजीमध्ये अशीच एक चिकट पदार्थाची तार निघते. साखरेच्या पाकामधेही साखरेच्या द्रावणातून चमचा उचलला असता अथवा थेंब सोडला असता एक, दोन वा तीन तारा निघालेल्या दिसतात तेव्हा तो एकतारी, दोनतारी वा तीनतारी पाक असतो.तारायंत्रांमध्येही सुरुवाती-सुरुवातीला विद्युत्चुंबकीय संदेशांची ने-आण करण्यासाठी तांब्याच्या तारा वापरल्या जात. तारांवर चालणारे ते तारायंत्र. त्याद्वारे पोचवलेला संदेश म्हणजे 'तार'. हे सर्व शब्द एकाच गटात मोडतात.
संस्कृत तॄ तरति ह्या धातूवरून मराठीत अनेक शब्द आलेले आहेत़़. उत्तीर्ण, तरण, तरण-तलाव, तारणे, तारून नेणे, तार अथवा मार हा वाक्प्रयोग,तर, तरी, तारू, तीर्थ, तारक, (तारणारा ह्या अर्थी) हे सर्व व यांसमान शब्द एकाच गटात येतील.
आकाशस्थ तेजस्वी गोल या अर्थाने मराठीत अनेक शब्द आहेत.तारे,तारका, तारांगण, तारांबळ(ताराबलम् वरून), डोळ्यांसमोर तारे चमकणे वगैरे शब्द आणि वाक्प्रचार एकाच गटात मोडतील.
अर्थात तर किंवा तार अंतर्भूत असलेल्या शब्दांची अर्थनिहाय बहुविध गटविभागणी आवश्यक नव्हती.