आयुकाच्या सायन्स पॉप्युलरायझेशन लॅबमध्ये हाताने घासून दुर्बिणीचे आरसे करण्याची कार्यशाळा असते, किमान असायची.  हे सर्व करण्यासाठी आयुकाची मदत मिळते. दुर्बिणीसाठी लागणाऱ्या वस्तूंची किंमत द्यावी लागते. काच घासून तयार झाली की आयुकातली व्यक्ती त्यांच्या ठरलेल्या दुकानातून त्यावर आरशासाठी लेपन करून आणते. 
बाकी गोष्टी आयुकाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही स्वतःच करत असल्यामुळे ही  दुर्बीण फारच स्वस्तात पडते.

मी पुण्यात असताना जेव्हा वेळ मिळेल त्यानुसार आयुकात जाऊन असा आरसा घासून तयार केला होता. ती सहा इंची एकनेत्री होती. पीवीसी पाईप वापरून त्यात तो आरसा बसवून दुर्बीण तसेच त्यासाठीचा लाकडी स्टँडही केला होता. पुढे देश सोडताना ती दुर्बीण खगोल मंडळाला भेट दिली.

अशी कार्यशाळा आयुकामध्ये अजूनही सुरू असल्यास चौकशी करून पाहता येईल. स्वतःच्या हाताने अशी मोठी दुर्बीण करण्यामध्ये वेगळा आनंद मिळतो, दुर्बिणीविषयी शिकायलाही मिळते आणि अश्या दुर्बिणीतून आकाश पाहताना अभिमानही वाटतो. मात्र ही दुर्बीण पक्षीनिरीक्षणासाठी वापरता येत नाही.