रचनेचा अभिप्रेत अर्थ देत आहे.
गुंतवू नकोस.... देह ठेवला असेल तर
मी उगाच एक डाव खेळला असेल तर?
माझ्या चितेपुढे उभे राहून रडणाऱ्या दोस्ता, रडून मला पुन्हा या जगात गुंतवू नकोस. मी हा आयुष्याचा डाव उगाच खेळायचा म्हणून खेळलो होतो. मी त्याबाबतीत फारसा गंभीर नव्हतो. तुझ्या रडण्यामुळे मी उगाच पुन्हा गुंतायचो.
कारणास कारणे नि त्यांस कारणे पुन्हा
मूळ शोधण्यास जीव नेमला असेल तर?
प्रत्येक गोष्टीला, सजीव अस्तित्वाला एक कारण असते. म्हणजे, मी ही रचना लिहिली कारण मी लिहू शकतो व मला सुचू शकते. हे सगळे मला होते कारण मी आहे. मी आहे कारण माझे आई वडील. ते किंवा त्यांचे आई वडील होते कारण त्यांचेही आई वडील. ही साखळी शेवटी विश्वाच्या रहस्याशीच जाऊन थांबणार. मुळात कुणाच्यातरी इच्छेने किंवा आपोआप हे विश्व निर्माण झाले त्यामुळे हे सर्व चालू आहे. ते मूळ काय, म्हणजे ती इच्छा कुणाची किंवा ते आपोआप होणे का असावे हे शोधण्यासाठी जर आपला जीव नेमला गेलेला असेल तर मी आजपर्यंत काहीच काम केले नाही म्हणावे लागेल. नुसताच या जगात मी आपला रमत बसलो.
काय माहिती... जिला नमेन त्याच मूर्तिने
माणसापुढेच हात टेकला असेल तर?
हा शेर आपण नोंदवला आहेतच.
अर्थहीनतेस अर्थ द्यायला हवाच का?
मी सहज म्हणून जन्म घेतला असेल तर?
मतला व या शेरामध्ये फरक आहे. मतल्यात मेलेला माणूस 'मला पुन्हा गुंतवू नको' असे म्हणत आहे तर येथे जिवंत माणूस म्हणत आहे की 'मी येथे आहे म्हणजे अगदी सगळे मनस्ताप सहन करून माझ्या अस्तित्वाला अर्थ, उद्देश प्राप्त करून दिलाच पाहिजे का, मी आपला सहज म्हणून एक जन्म घेऊन बघितला असेल तर नुसते तटस्थ जगायला काय हरकत आहे'. येथे धावपळीच्या व पराकोटीच्या ताणाच्या जीवनात निर्माण झालेला उद्वेग आहे.
घेतलेस ते इथेच सोडलेस तू जरी
मन तपासण्यास हेर पेरला असेल तर?
गीता सार मध्ये म्हणतात की 'जे इथे मिळवशील ते इथेच सोडून जाशील'! ते ठीक आहे. पण एखादी गोष्ट, जसे दौलत, जमीन, वारसा वगैरे मिळवताना व मिळवल्यानंतर तसेच सोडताना जर मनात त्या गोष्टीचा आत्यंतिक लोभ किंवा मोह असेल तर ते सर्व इथेच जरी सोडलेस तरी तू पापी ठरशीलच की? मग तुझ्या मनातील पापांची नोंद घेण्यास जर एखादी व्यवस्था केली गेलेली असली तर तू काय करणार?
भिन्न मिश्रणे जमीन, तेज, तोय, नभ, हवा
त्यात काय जर प्रसंग बेतला असेल तर?
पंचमहाभूतांपासून सर्व अस्तित्व आहे (या पृथ्वीवरील व आपल्याला ज्ञात असलेले अस्तित्व)! माती, अग्नी, पाणी, आकाश व वायू यांची भिन्न भिन्न मिश्रणे म्हणजे अनंत प्रकारच्या सजीव व निर्जीव गोष्टी! मग तुझा मृत्यू म्हणजे तरी काय? त्याच पाच गोष्टींचे एक वेगळे मिश्रण नाही का? मग तसा प्रसंग बेतलाच तर प्रॉब्लेम काय आहे?
'बेफिकीर' या जगात नम्र राहणे बरे
गोल फक्त हा सजीव ठेवला असेल तर?
हे जग तुझ्याशी बेफिकीरपणे वागणार आहे. तरीही येथे आपले तू नम्रच राहिलेले बरे आहेस. कारण हा पृथ्वीनामक गोलच जर फक्त सजीवसृष्टी धारण करणारा असेल तर तू दुसरीकडे जाणार कुठे?
---------------------------------------------------------------------------------
शब्दरचनेतून तसा अर्थ निघत नसल्यास माझे अपयश!
धन्यवाद!