सामान्य जनतेने आपली 'रयत' मानसिकता आणि राजा-प्रजा, अथवा पाटील/सरपंच/खोत/मुखिया व आपण ही मनोधारणा टाकून निर्भयपणे कर्तव्य आणि हक्कांची जाण असलेला नागरिक बनण्याचे प्रयत्न केले तर हळूहळू हे शक्य होईल. ही वृत्ती सुद्धा सरकारनेच लोकांच्या अंगी बाणवावी असे वाटत असेल तर मार्गच खुंटला. प्रगती व विकासासाठी लोकशाहीचा मार्ग हा राजमार्ग असला तरी तो शॉर्टकट नव्हे. जी निर्भयता व आत्मनिर्भरता यूरोपात अवतरायला ५००-६०० वर्षे लागली ती  मुळात टोळीसदृश स्थितीत वावरत असलेले आम्ही भारतीय आमच्यामध्ये चुटकीसरशी आणू शकू असे मानणे हा एक मोठा भ्रम आहे.स्वयंशिस्त, आत्मभान, तत्परता,जागरुकता ह्या क्षणात निर्माण होणाऱ्या गोष्टी नव्हेत.सर्वसामान्य जनतेची पातळी उंचावली तर त्यातून येणारे प्रतिनिधी उच्च दर्जाचे निघतील.