महाराष्ट्रात इतरत्र 'आल वेल' असले तरी मुंबईमध्ये मराठी लोकांची पत आणि ऐपत राहिली नाही हे खरे. ऐदीपणा आणि आळशीपणा, दुसरे काय? मराठी माणूस म्हणून मिळालेले रिक्शा/टॅक्सी परवाने भाड्याने देऊन किंवा विकून मिळेल तितक्याच पैशात, दुसरे काहीच न करता 'समाधानाने' जगून मराठी माणसाने इतरांना चरायला रान मोकळे करून दिले. इतरांनी त्याच रिक्शा मेहनतीने दोन दोन तीन तीन पाळ्यांत चालवून आणखी तीन रिक्शा घेतल्या आणि त्या चालवायला आपापल्या मुला-भाच्या-पुतण्यांना इथे आणले. शिधापत्रिका,वाहनपरवाना, इतर अनेक परवाने देणारे मराठीच लोक. कुणी कोणावर अन्याय केला?  मराठी माणसाच्या हातात पैसा खेळू लागला आणि सत्कार्य व सत्कारणासाठी मराठी लोकांकडून पैशाच्या थैल्यांची तोंडे मोकळी होऊ लागली की परिस्थिती चुटकीसरशी बदलेल. अर्थव्यवहाराबरोबरच साहित्य, विद्या, कला यांचा व्यवहार भरभराटीस येईल. आज गुजरातमध्ये एखाद्या मध्यम प्रकाशन संस्थेचा (ग्रंथालयाचाही) व्यवहार कोटीच्या घरात असतो! 'सॅटरडे क्लब' यासारख्या काही संस्थांनी मराठी माणसात व्यापार-उद्योग, उद्यमशीलता बाणण्यासाठी अगदी योग्य, नेमके व प्रशंसनीय पाऊल उचलले आहे. त्यांना साथ व अनुकरण दोन्ही व्हायला हवे.