व्ही के,
तुमची लेखमाला पूर्वी लिहिल्याप्रमाणे अगदी वाट बघून वाचत असतो. तुमचे अनुभव हृदयस्पर्शी आहेत. अनेक संकटांचा सामना करायला लागल्यावर माणूस टोकाची भूमिका घ्यायला लागणंही साहजिक आहे. पण-
ह्या इंग्रजांना नसलेल्या लाजलज्जेचा अति गर्व असतो.
हे एक आजचं वाक्य आणि अशीच वाक्यं पूर्वी तुम्ही 'शिकलेले लोक' या प्रकारच्या लोकांबद्दल वापरली आहेत ती मात्र खटकली.
लेखक पी. जी. वुडहाऊस यानं म्हटल्याप्रमाणे 'आय डोंट हेट इन प्लुरल्स' (पुलंनी त्यांचं भाषांतर केलं आहे - 'मी असा घाऊक तिटकारा कधीच करत नाही') हे कृपया लक्षात ठेवावं. हे त्यानं जर्मनीनं त्याचा महायुद्धात अतोनात छळ केल्यावर नंतर एका मुलाखतीत त्याला जर्मनांचा राग येतो का असं विचारल्यावर तो म्हणाला होता!
प्रत्येक माणूस वेगळा असतो. आपण सर्वच जण बऱ्यांचदा 'हे मुसलमान असेच', 'हे गुजराथी असेच', इ. म्हणतो. गंमत म्हणून हे ठीक आहे, पण कितीतरी लोक या अशा 'घाऊक' वर्गवारीत न बसणारे असतात आणि त्यांचावर आपण असं बोलून अन्याय करत असतो असं मला वाटतं.
- कुमार