मोहनाजे,
आपुलकीने विचारल्याबद्दल सर्वप्रथम आपले धन्यवाद!
सगुणा या एकांकिकेचा वृत्तांत -
ही एक एकांकिका स्पर्धा होती. ज्ञानक्रांती संस्थेने आयोजीत केली होती. पुणे व मुंबई येथील मिळून एकंदर २१ स्पर्धकांपैकी २० सहभागी झाले होते.
आमची एकांकिका पहिल्या दिवशी तिसरी होती. मात्र पहिली एकांकिका रद्द झाली व दुसरीतील कुणालातरी अपघात झाल्यामुळे त्यांनी वेळ बदलून मागीतली. त्यामुळे आमचीच एकांकिका पहिली झाली.
सगुणा ही कथा मी मनोगतवरच लिहिली होती. मात्र त्यात भरपूर बदल करून (खरे तर काटछाट करून) त्या कथेला संवादरूप देऊन त्याची पटकथा केली.
या कथेत ग्रामीण विभागातील एका सुनेचा छळ होतो. तिला मूल होत नसल्याने तिला मारहाण होत असते. नवरा गावातील एका नाचणारणीच्या मागे लागलेला असतो तर त्याचा बापही तिच्याच मागे लागलेला असतो. सासू एकदा सुनेला तालुक्याला तपासण्या करून यायला सांगते. ते दोघे तालुक्याला जाऊन येतात त्या दिवशी सून सांगते की डॉक्टरांनी सांगीतल आहे की तुमच्या मुलातच दोष आहे. त्यावेळेस अपमान सहन न झाल्याने तिघेही तिला मारहाण करतात. दुसऱ्या दिवशी सासू तिला सासऱ्याबरोबर जायला सांगते. सगुणा (सून) कळवळीने विरोध करते पण सासरा तिला हेडू लागतो. तिचा नवरा एक दिवस रात्री रुपाच्या (नाचणारी) घरी जाऊन सांगतो की उद्या नवरत्राची अष्टमी आहे. उद्या आम्ही तिघेही सगुणाला बांधून तिचे मुंडके तोडणार आहोत. मुंडके झाडीत टाकून धड हायवेवर फेकणार आहोत. म्हणजे धड मिळालेच तरी लोकांना अपगात वाटेल. नाचणारी बाई मनाने चांगली असते. ती हे मध्यरात्री येऊन सगुणाला सांगते.
दुसऱ्या दिवशी रात्री तिला तिघे जण घरात बांधायला लागतात तेवढ्यात गावात जोगवा सुरू होतो. त्याचा आवाज ऐकून तिघेही क्षणभर दचकतात त्यातच सगुणा सुटते व गावात देवीसमोर येते. तिघेही मागून पळत येतात. नाचणारी हे चोरून पाहात असते. ती दोर व कुऱ्हाड घेऊन या तिघांच्या मागून देवीपाशी येते. गाव जमलेले असते. सगुणाला सासरचे ओढायला लागतात तशी ती पटकन देवीसमोर जाऊन अंगात आल्याचा अभिनय करते. जोगवा संपतो त्यावेळेपर्यंत भोळे गावकरी तिला देवी समजतात. तिला काय हवे विचारल्यावर ती तीन नरबळी हवे आहेत म्हणून सांगते. तिने बळी दाखवल्यावर गावकरी या तिघांना पकडतात. ते सुटायची धडपड करत असताना नाचणारी त्यांना कुऱ्हाडीच्या धाकाने जाऊ देत नाही. शेवटी त्यांना बंधल्यावर पहिला बळी देणार तेवढ्यात सगुणा आपला अभिनय सोडून एक मोठा डायलॉग म्हणते. त्याचा सारांश असा की जेव्हा तिचा छळ होत होता तेव्हा गावातले लोक नुसते बघत होते. आता देवी झाल्यावर लगेच नरबळी द्यायला निघाले आहेत. मी माझ्या सासरच्या लोकांना अशी मरू देणार नाही. नुसती मुंडी हलवून बाई नाचली की तिची देवी होत नसते. यांना सोडून द्या. गावकरी खजील होऊन त्यांना सोडतात तसे ते तिघेही देवीच्या पाया पडतात. त्यावेळेस नाचणारी बाई त्यांना सांगते की सगुणाच्या पाया पडा. तिने तुमचा जीव वाचवला आहे. सासू सगुणाच्या पाया पडायला जाते तशी सगुणा तिला जवळ घेते व पडदा पडतो.
यात सुरुवात ज्या लावणीने होते ती व जोगव्याचे गीत हे मी रचलेले आहे. तसेच कथा, पटकथा व दिग्दर्शनही मीचे केले होते. जोगव्याचे गीत काही प्रमाणात गायलेही मीच!
मात्र आमची ही एकांकिका प्रभावशाली होऊ शकली नाही. याचे कारण आम्हाला आठ दिवसांहून जास्त वेळच मिळाला नाही तयारीला. खरे तर एक दिवसा आड अशी परिस्थिती उद्भवत होती की एकांकिका रद्दच होतीय की काय? शेवटी ती कशीबशी उभी राहिली.
मात्र पहिला प्रयत्न असूनही सगुणाची भूमिका करणाऱ्या स्वरदा बुरसे या मुलीला एक पारितोषिक जरूर मिळाले.
सर्व कलाकार महाविद्यालयीन विद्यार्थी होते.
मुख्य म्हणजे आमची एकांकिमा दिलेल्या वेळात, म्हणजे अक्षरशः ४५ मिनिटातच पार पडली. एक मिनिट जास्त नाही की कमी नाही.
साधारण ५० ते ६० प्रेक्षक होते कारण ती पहिलीच एकांकिका होती स्पर्धेतील!
ही कथा मी मूळ (व वेगळ्याच ) स्वरुपात सर्वप्रथम मनोगत वर प्रकाशित केलेली होती. यासाठी मनोगतचे प्रकाशक, विश्वस्त व वाचक यांचे आभार!
आता आम्ही हीच एकांकिका इतरत्र सादर करण्याच्या प्रयत्नात आहोत. एकंदर सहभागी कलाकार (पडद्यामागचेही धरून) पंधरा झाले.
धन्यवाद!
'बेफिकीर'!