प्रिय अजय भागवत,
मुंबई मॅरेथॉन २०१० बद्दल मनोगतवर फारसे कोणी लिहिले नव्हते, ती कमी आपण पूर्ण केलीत याबद्दल धन्यवाद!
मुंबई मॅरेथॉन च्या संकेतस्थळावर जाऊन संयम यांचा बिब क्र. टाकून त्यांचे छायाचित्र पाहिले तसेच शर्यत पूर्ण करण्याची वेळ पाहिली. पहिल्याच प्रयत्नात २ तास ५६ मि. एवढ्या कमी वेळात शर्यत पूर्ण केली आहे. संयम चे मनःपूर्वक अभिनंदन !
मी देखील अर्ध मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता. पण मला बराच वेळ म्हणजे सुमारे साडेतीन तास लागले. मी देखील पुढील वर्षी भाग घेणार आहे व शर्यत अडीच तासात पूर्ण करण्याच्या उद्देशाने सराव करणार आहे.
यंदा सर्व पूर्ण व अर्ध मॅरेथॉन धावकांना Champion Chip दिल्या होत्या. ही चीप बुटावर बांधायची असते. यातील यंत्रणा प्रारंभ रेषा , ७ किमी , १४ किमी व अंतिम रेषेवर वेळेची अचूक नोंद करते. ती वेळ २ दिवसात महाजालावरील संकेतस्थळावर घोषित केली जाते.
३ तास ४५ मिनिटात स्पर्धा पूर्ण करणाऱ्यास स्पर्धा पूर्ण केल्याचे Timing प्रशस्तीपत्रक मिळते जे आपण महाजालावर बघू शकतो.
मुंबई मॅरेथॉन २०१० ची छायाचित्रे marathon-photos.com या संकेतस्थळावर अजूनही उपलब्ध आहेत. जरूर पहा. चीपचा उपयोग फक्त वेळ मोजण्याकरताच नाही तर छायाचित्रांची वर्गवारी करण्यासाठीसुद्धा करून घेतला आहे. संकेतस्थळावर पाहिल्यास टोपी घातलेले स्पर्धक , टोपी न घातलेले , विशिष्ट रंगाची टोपी / टिशर्ट घातलेले स्पर्धक , स्त्री स्पर्धक, पुरूष स्पर्धक अशा विविध प्रकारे शोध घेऊन आपण फोटो पाहू शकतो. स्पर्धकाचे नाव / क्रमांक यावरून त्याचा फोटो सापडतो. हे सर्व चीपमुळे शक्य झाले आहे.
संयम यांनी संगितलेले अनुभव मी ही घेतले. वांद्रे - वरळी सागरी सेतूवरून धावण्याचा अनुभव रोमांचकारी होता. नेमका तेव्हाच सूर्योदय झाला होता. बहुतेक धावक मोबाईलने छायाचित्रे घेण्यात दंग झाले होते. मी ही अपवाद नव्हतो.
एका पत्रलेखकाचे दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये मॅरेथॉनवर टीका करणारे पत्र आले होते की ही धावाधाव कशासाठी? त्यातील काही मुद्दे बरोबर होते की यामुळे क्रीडा संस्कृती वाढणार नाही की खेळाडू घडणार नाहीत. पण तरिही खूप लोक या निमित्ताने धावू लागले, आरोग्याकडे लक्ष देऊ लागले हे ही नसे थोडके. सर्व मिळून ३८००० लोक (पैसे भरून) सहभागी झाले होते. एक चॉकलेट ची जाहिरात लागते त्यात एक जण विचारतो 'मेलडी इतनी चॉकलेट भरी कैसे बनी....? " त्याचे जे उत्तर देतो त्याच धर्ती वर मॅरेथॉन बद्दलही म्हणता येईल "मॅरेथॉनमें दौडो और खुद जान जाओ"
धन्यवाद
- मंदार