वाघाला लागलेली घरघर स्पष्टच दिसत आहे. जनमानसात, प्रसिद्धिमाध्यमात आपण होऊन त्यांनी स्वप्रतिमा मलिन करून घेतली आहे. भावनिक मुद्द्यांवरचे राजकारण थोडावेळ चालेल, लोक थोडे बहकतील, थोडे जवळ जातील, पण दीर्घकाळासाठी त्याचा उपयोग नाही. मराठी लोकांचे पोटापाण्याचे प्रश्न फक्त आंदोलने करून सुटणार नाहीत तर नवीन व्यवसायसंधी, रोजगारनिर्मिती करून सुटतील. शिवसेनेला शहरांमध्ये मराठी उद्योजक निर्माण, मराठी संघटन यांवर भर द्यावा लागेल, खेड्यांत व्यापक लोककल्याण व रोजगार निर्माण करणाऱ्या कार्यक्रमांना हाती घ्यावे लागेल  व सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करावा लागेल.  शिवाय भडक माथ्याने तोडफोड, दगडफेक, हिंसाचार यांमार्फत क्षोभ व्यक्त करणे, वारंवार कायदा हातात घेणे सोडून सभ्य मार्गांनी, प्रसिद्धिमाध्यमांना जवळ करत नवी प्रतिमा निर्माण करावी लागेल.