या मालिकेचे नाव चार वेगवेगळ्या रीतीने लिहिले गेले आहे.
(१) ओ डयूऽऽड!--'य'ला नुक्ता दिला आहे, तो कसा उमटवला ते माहीत नाही! येथे, 'ड'ला य जोडलेला नाही.(२)ओ ड्यूऽऽड! --'य'ला नुक्ता नाही! (३) ओ.. ड्यूड, आणि (४) ओ ड्युड.  नक्की मथळा काय द्यावयाचा यात लेखिकेचा गोंधळ झालेला दिसतो आहे.
(Dude)डूड किंवा ड्यूड हा शब्द फक्त अनौपचारिक किंवा स्लँग(अ-शिष्टसंमत) बोलीभाषेत वापरला जातो असे शब्दकोश पाहिल्यावर कळाले. अर्थ विविध आहेतः--(अ) अतिचोखंदळ;  सौंदर्याभिरुची असलेला; प्रतिष्ठित लोकांसारखे इंग्रजी  बोलण्याचे, इंग्रजी वस्त्रप्रावरणे वापरण्याचे आणि इंग्रजी रीतिरिवाज पाळण्याचे अनुकरण करणारा पोषाखी माणूस.(आ) स्वतः  पेहेरलेल्या पोषाखाच्या आणि स्वतःच्या समाजात वागण्याच्या पद्धतीकडे जाणीवपूर्वक लक्ष असलेला (३) मोठ्या शहरात वाढलेला (४)पश्चिम भागातील कुरणावरती सुट्टी घालवणारा अमेरिकेच्या पूर्वेकडच्या  शहराचा नागरिक...वगैरे. 'ओ' म्हणजे अर्थात मराठीतला अ‍े किंवा ओ किंवा अहो. म्हणजे लेखमालिकेची नावे अमेरिकी संस्कृतीनुसार यथार्थ असावीत. (ड्यूडअ‍ैवजी भावखाऊ किंवा भावड्या चालले असते.)
लेखांत  जिथेतिथे जी टिंबाटिंबांची बोलीभाषा वापरली आहे, ती मात्र खटकते. अनेकदा टिंबे चुकल्याने शब्दांचे उच्चार विपरीत होतात असे ज़ा‌णवते.  उदाहरणार्थ--
वाचलं, खरंच यासारख्या शब्दांमधल्या योग्य अक्षरावर अनुस्वार पडला नाही तर त्यांतल्या 'च'चा उच्चार 'कवच'मधील च सारखा होतो. असे अनेकदा झाले आहे.मोठ्या प्रयत्‍नान्ती  आपण मराठीतले अनुच्चारित अनुस्वार काढून टाकले होते, ते आता दुप्पट ज़ोमाने आपल्या डोंबलांवर बसले आहेत असे वाटायला लागले आहे.    याला उपाय म्हणजे, साडेतीन टक्क्यांची बोलीभाषा न वापरता, प्रमाण मराठी वापरणे. ही प्रमाण मराठी भाषा,  जगात जिथेजिथे मराठी माणूस असेल तिथेतिथे त्याला ती,  आपलीच वाटते हे नक्की!
ही मालिका पूर्वी  विवामध्ये वाचली होती तेव्हा हा दोष इतक्या प्रकर्षाने ज़ा‌‌णवला नव्हता.-अद्वैतुल्लाखान