जी गोष्ट आज़ ऐच्छिक आहे, ती उद्या सक्तीची होते. माझी बहीण पुण्यातून इंग्रजी आणि गणित न घेता मॅट्रिक झाली. त्या काळी हे विषय अ‍ैच्छिक होते, आज़ आहेत? भारतात वांग्याच्या दोन हज़ार ज़ाती आहेत असे म्हणतात. या सर्व वांग्यांच्या चवीत थोडाफ़ार फ़रक  असणारच. हे वैविध्य नष्ट करून आपल्याला काय मिळणार?  महाराष्ट्रातल्या तांदुळाच्या वरंगळ, शेप्या वरंगळ, धुड्या वरंगळ, डोंगरे, बुगडी, वाकसाळ, राजावळ, सकवार, मुडगा, टाकळे, मासडभात, हरकल, डामगा, डामरगा, जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, गोदवेल, राता, पटणी आणि त्याच्या अनेक  उपज़ा‌‌ती, चिमणसाळ, चिन्‍नोर, झिल्ली, मालकुडई, पांढरी साळ, काळी साळ, तांबसाळ, तांबकुडय,  या सर्व ज़ाती कुठे गेल्या? आंबेमोहोरदेखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. उरले आहेत काय तर, ज्याचा चविष्ट भात करता येत नाही  असा  फ़क्त बिर्याणीच्या उपयोगाचा अळ्यांसारखा दिसणारा बासमती, कोलम, परिमल, कमोद आणि उकड्या तांदुळासारखे इडली-डोसाउपयोगी आणि असलेच काही भरड तांदूळ. या जपानी  भातशेतीने  भाताच्या जेवणातली पेशवाई लज्‍जत संपवली!  आणि कायकाय संपवणार?  वांगे ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. तरीही बियाणासाठी अमेरिकेची गुलामगिरी पत्करायची? अनेक देशांनी झिडकारलेले बीटी वांगे आपण का स्वीकारावे? आज़ भारतातल्या बाज़ा‌‌रांत चिठ्ठ्या चिकटवलेली परदेशी संत्री आणि सफरचंदे मिळतात. त्यांना अजिबात चव नसते. भले ती फ़्रेन्‍च असतील किंवा अमेरिकी.  ज़ो एकदा घेतो तो पस्तावतो. असेच बीटी वांग्यांचे होणार, विकत घ्या आणि पानात पडल्यावर टाकून द्या. त्यांना का कृष्णाकाठच्या वांग्याची चव असणार आहे?