जन्म: २३ जून १८८८, मृत्यू: १९४९. कवी, कादंबरीकार. शालेय शिक्षण धुळे व महाविद्यालयीन पुणे येथे. 'लोकमान्य' व 'वाङ्‍मय' या मासिकांचे संपादक. पुस्तक-प्रकाशन, वाचन व लेखन हाच व्यवसाय.
रविकिरण मंडळाचे समकालीन कवी. १९११ मध्ये काव्यलेखनाला आरंभ. त्यांची कविता केरळकोकीळ(नवा), विविधज्ञानविस्तार, चित्रमयजगत्‌    इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध. 'मधुमालती'(सामाजिक खंडकाव्य) व 'काही स्फुट कविता भाग १'(१९१४), आणि 'काव्यानंदमंजूषा'(१९१८) हे कवितासंग्रह. इंग्रजी कवितेची छाप असलेली रूढ जातिरचना असलेली  जुन्या छंदातील निफाडकरांची कविता निसर्गसंवादी, सुगम, प्रासादिक असून समकालीन कवितेशी एकरूप झालेली होती. मधुमालती(१९१४)हे सामाजिक, तारागड(१९१६)हे तात्त्विक विषयावरील, तसेच सोनपत पानपत अथवा सोक्षमोक्ष(अपूर्ण, १९२३), आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या कथेवरील सतीचा शाप (१९२४) ही  अ‍ैतिहासिक, अशी निफाडकरांची चार खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत.
राष्ट्रीय शिक्षणाची फळे (१९२१), व महात्मा गांधी सैतान की साधू? (१९३०) या त्यांच्या कादंबऱ्यांपैकी दुसरीत त्यांनी महात्मा गांधी साधू असल्याबद्दलचा निर्वाळा दिला आहे.
एकनाथ निफाडकरांनी आणि त्यांच्या पत्‍नी सौ. इंदिराबाई निफाडकर यांनी लिहिलेला मानारचे आखात (१९३०) हा कथासंग्रहही प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळक चरित्र:पूर्वार्ध(१९२०), बालकवींची समग्र कविताःभाग १(१९२३), बालकवींची मधुगीते व गोदातटीचा गुंजारव(१९३०) ही त्यांनी संपादित केलेली  पुस्तके. --जयंतकुमार बंड आणि उषा टाकळकर यांनी लिहिलेल्या लेखांवरून.