जानेवाले से मुलाकात..

(येथे ऐका)

दिदीचा स्वर, यमन आणि मधुबाला. विषय संपला!

अतिशय सुंदर गाणं. दिदीने अगदी मन लावून, आर्ततेने गायलं आहे. रिषभावरचा ठेहेराव, "गम'प" संगती, तार षडज, सगळंच सुरेख.. संथ लय, सुंदर ठेका. यमनचं अजून एक वेगळंच रूप!

आज १४ फेब्रुवारी. व्हॅलेंटाईन दिन आहे म्हणे. असेल..!

आम्हाला इतकंच माहीत आहे की आज मधुबालाचा जन्मदिवस आहे.. त्या जिवंतपणी दंतकथा बनलेलीचा जन्मदिन!

ती एक शापित यक्षिण! तिची मोहकता, तिचं सौंदर्य, तिची अदाकारी, तिचं हास्य, तिचा अभिनय, तिची प्रत्येक गोष्टच जगावेगळी होती, खानदानी होती!

जिथे सौंदर्याच्या सर्व व्याख्या संपतात, जिथे सुरेख-सुंदर-मधाळ-अवखळ-अल्लड-सौंदर्यवती-लावण्यवती-सौंदर्यखनी

इत्यादी अनेक शब्द केवळ अन केवळ तोकडे पडतात! नव्हे, या शब्दांचा केवळ फापटपसाराच वाटतो..!

आम्ही रंभा, उर्वशी, मेनका वगैरे नाही पाहिल्या! पाहायची तितकिशी गरजही नाही. कारण..

.... कारण आम्ही मधुबालेला पाहिलं आहे आणि तेवढंच आम्हाला पुरेसं आहे!

'दिलकी दिलही मै रही बात ना होने पायी.. ' असंच काहीसं घडलं या शापित यक्षिणीच्या प्रत्यक्ष आयुष्यातही..!

आज तिच्या जन्मदिनानिमित्त आम्ही तिला साश्रू नयनांनी याद करत आहोत..

-- तात्या अभ्यंकर.