आपण म्हणता त्याप्रमाणे कुणाबरोबर तरी फिरताना स्वतःची ओळख लपवणे ह्या मुद्याशी सहमत पण स्कार्फ बांधण्याशी फिगरचा संबंध कसा जोडला हे कळले नाही. कारण कमी कपड्यात वावरणाऱ्या महिलांपैकी किती महिला स्कार्फ वापरतात किंवा स्कार्फ वापरणाऱ्या किती महिला कमी कपड्यांत असतात, हे सांगणे अवघड आहे.

मला जाणवलेला आणखी एक मुद्दा असा की अलिकडे अनेक मुलींना एकतर्फी प्रेमाच्या असुरी प्रवृत्तीचा त्रास जाणवतो. उदाहरणे देण्याची गरज भासू नये इतक्या सहज बळी पडलेल्या मुलींची नावे आठवतील. अशा वेळी स्वतःची ओळख, चेहऱ्याचे सौंदर्य लपविण्यासाठीही स्कार्फ बांधण्याची गरज पडत असावी. अर्थात, एकतर्फी प्रेम करणाऱ्यांना चेहरा हेच एकमेव आकर्षण असते का किंवा स्कार्फ बांधल्याने अशा प्रेमवीरांचा त्रास किती वाचवता येतो, हा वेगळा मुद्दा. परंतु, स्कार्फ बांधल्याने काही प्रमाणात स्वतःला सुरक्षित ठेवता येते एवढे नक्की.

आता पुण्याच्या पोलिस आयुक्तांच्या विरोधासंदर्भात. त्यांच्या मते मुलींनी स्कार्फ बांधले नाहीत तर त्या तंत्राचा वापर दहशतवादीही करू शकणार नाहीत. हे म्हणणे तितकेसे खरे नाही. कारण (मुस्लिमेतर) मुलींनी स्कार्फ वापरणे सोडले तरी बुरखा घेऊन वावरणाऱ्या महिला, मुली बुरखा वापरणे सोडणार नाहीत. कारण त्यामागे धार्मिक फतवे आहेत. मग दहशतवादीही स्कार्फ सोडून बुरखा वापरू लागतील. म्हणजे स्कार्फ बांधल्या न बांधल्याने काहीच फरक पडत नाही. येथे दहशतवाद्यांशी क्रांतिकारकांची तूलना करण्याचा उद्देश नाही, पण भगतसिंगांच्या चरित्रातही ब्रिटीश पोलिसांपासून स्वतःला लपविण्यासाठी त्यांनी बुरखा वापरल्याचा उल्लेख सापडतो. त्या काळात मुली स्कार्फ वापरत नव्हत्या, हे नक्की. कारण ही फॅशन अलिकडच्या दहा वर्षात अधिक दिसते. राजीव गांधी किंवा मानवी बाँबद्वारे ज्यांचा मृत्यू घडवून आणला गेला, अशा किती जणांच्या संदर्भात स्कार्फने किंवा अन्य प्रकारे चेहरा लपविण्याचा प्रकार आढळेल, म्हणून त्या मुद्द्याचे समर्थन करावे ? अलिकडची फॅशन म्हणून दहशतवाद्यांकडून बुरख्याऐवजी स्कार्फ वापरला जाण्याची शक्यता अधिक असू शकते एवढेच. आता प्लॅस्टिक सर्जरी करून वेगळ्या चेहऱ्याचा आभास निर्माण करता येतो, तसेच दूर नियंत्रणाद्वारे किंवा टाईमर लावून विशिष्ट वेळेला स्फोट घडवून आणता येतो, तेव्हा चेहरा झाकण्याची गरजच मुळात फारशी राहिलेली नाही, मग स्कार्फचा मुद्दाही तितकासा टिकणारा नाही.