या विषयाचा एक वेगळा पैलू मांडण्याचा प्रयत्न करतो.
१. 'कल्पनेने कल्पनेचे निराकरण' हि भक्तीयोगाची प्रणाली नाही. तो ओशो नि लावलेला अन्वयार्थ आहे. अध्यात्मिक शोधाचा प्रवास निराकार, शून्य किंवा निर्वाणाप्रत जातो या गृहितकावर तो आधारित आहे. (आपापल्या धारणा किंवा पिंड यानुसार तो काहींचा स्वानुभवही असू शकतो). ही संकल्पना सर्वसमावेशक किंवा प्रमाणभूत खचितच नाही.
२. सगुण साक्षात्कार हा भ्रम किंवा भास आहे असे छातीठोकपणे सांगणे हे धाडसी विधान आहे. असे अनुभव व्यक्तिगत स्वरूपाचे असल्याने त्यावर मल्लीनाथी करणे किंवा दाखलेबाजी करणे या पलीकडे फारसं काही करता येत नाही. पूर्णपुरूष किंवा पुरुषोत्तम हा आधिभौतिक (अफाट, अमर्याद विश्व), आधिदैविक (देव, देवता ज्यांच्याशी अतींद्रिय, अतिमानस पातळीवरच संबंध येतो, सिद्धी प्राप्त होऊ शकतात) आणि अध्यात्मिक (निर्गुण, निराकार ब्रह्मास्वरूप) या तिन्ही स्वरूपात असतो हि संकल्पना जास्ती सयुक्तिक वाटते. व्यक्तिपरत्वे या विषयी मतभिन्नता असतेच. उदा. जडवादी अधिभौतिका पलीकडे काहीच नाही असे मानतात.
३. स्थळ आणि काल यांच्या पलीकडची अनुभूती येणे (किंवा शरीराबाहेराचे अस्तित्व इ. ) म्हणजेच अध्यात्मिक अनुभूती - मग ती कशी का येईना (उदा. चक्कर येईपर्यंत फिरणे, संभोगातून, अमली पदार्थातून, किंवा तथाकथित सक्रीय ध्यान करून) हा विपर्यास आहे. तो फक्त ध्यानाचा धंदा करणार्यांना सोयीचा आहे.
४. कर्मयोगावर उत्पादनाच्या दर्जाचे खापर फोडणे विपर्यस्त आणि अनाठायी वाटले. (उदा. कुठल्याही कारखान्यात जाऊन कामगार वर्गामध्ये "तू कर्मयोगाच्या सिद्धांताविषयक गोंधळामुळे असा आहेस काय? " याचे सर्वेक्षण गरजूंनी करावे. अनभिज्ञाताच आढळेल. ) कर्मयोग हा एक व्यापक विचार आहे. अहं विसरून, तल्लीन होऊन काम करणे हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे. शिवाय कर्म, विकर्म, अकर्म विषयक सारासार विचार, नैपुण्य प्राप्ती, योजकता असे बरेच पैलू आहेत. कर्मयोगीच काय (टिळक, अरविंद, विवेकानंद) तर लोक ज्यांना मायावादी म्हणतात त्या आदी शंकराचार्यांनी फक्त ४२ वर्षाच्या आयुष्यात जे महत्कार्य केले ते आपल्याला ४२० वर्षात तरी जमेल का याचा अवश्य विचार करावा.
माझ्या अल्प वाचन, माहिती, स्वानुभव आणि निरीक्षणानुसार निर्गुणोपासना सर्वसामान्यांसाठी नाही. तसा अधिकार क्वचितच कुणाला असतो. निर्गुणोपासना सगुणोपसनेपेक्षा श्रेष्ठ, किंवा भक्ती म्हणजे एकप्रकारचा बावळेपणा, अगतिकता, अव्यवहारीपणा, आळशीपणा वगैरे आणि तथाकथित ज्ञानमार्ग म्हणजे थेट सत्याला भिडणे इ. अपसमज रूढ होत आहेत. तसा पिंड किंवा अधिकार नसताना उगाच निर्गुणामागे धावण्याचे काय परिणाम होतात याचे वर्णन श्री. संत बाबा महाराज आर्वीकर यांच्या गीता प्रबोध ग्रंथात सविस्तर दिलेले आहे. या विषयाचा वेगळा पैलू म्हणून अवश्य वाचावे.