अरुंधतीजी, समाजोपयोगी कार्यक्रम आपण व आपले सहकारी आत्मविश्वासाने राबवीत आहात्... खरंच कौतुकास्पद आहे.
मी बारा-तेरा वर्षांचा असताना नारायणगांवी राहात होतो. तेथे असताना (कै. ) मनोहर ठुसे यांच्या नेतृत्त्वाखाली शशी ठुसे, विद्वांस, अवचट, वैद्य आदींच्या बरोबर मीही गोणेघाट-नाणेघाट परिसरातील गांवातून गोवधबंदीबाबत जनजागृती करण्यासाठी फिरलो होतो. मनोहरने गोणेघाटाच्या तोंडाशी आम्हाला उभे करून दरीचे दर्शन घडविलेले अजूनही स्मरते. गोणेघाट दगड-गोट्यांनी भरलेला, सरळ (घाटरस्ता असतो तसा नव्हे) खाली उतरणारा पण मुंबईला जवळचा असल्याने कसायांनी खरेदी केलेली जनावरे या घाटातून उतरवीत असत. त्या रस्त्याने जाताना पडून कांही जनावरे रस्त्यातच दगावली जायची. हे ऐकून त्यावेळीही मनात त्या घाटाविषयी भीती दाटली होती. पण, तेथून दिसलेली धुक्यात फिकट होत गेलेली हिरवाई, हरवलेली झाडे, निळसर छटा लेऊन पसरलेला धुरकट प्रकाश आजही डोळ्यासमोर उभा राहातो. वरांधा घाटाच्याही आठवणी अशाच जाग्या झाल्या. पासष्ठ साली पुण्याहून सायकलवरून आम्ही चौघे जण रायगडला गेलो होतो. काड्यापेट्यांनी रांगोळी काढावी, तशी घाटमाथ्यावरून खालची शेते दिसत होती.