मी लग्नानंतर थोडंतरी कन्नड शिकावे अशी आमच्या सासरकडून आडूनपाडून मागणी होती. तसे आम्ही आधी मुंबईत, नंतर गल्फ आणि अमेरिका असे राहत असल्याने खूप मोठी अपेक्षा नव्हती पण जुजबी यावे इतकीतरी होती. घरात कन्नड आणि तुळू अशा दोन्ही भाषा मनाला येईल तशा बोलल्या जात. म्हणजे आई-वडिलांशी (सासू-सासरे) बोलताना तुळू. भावांशी बोलताना कन्नड वगैरे. माझा खूप गोंधळ व्हायचा. शेवटी नवऱ्याने सांगितले "प्रयत्न सोडून दे.  सर्वांना जुजबी हिंदी आणि इंग्रजी कळतं आणि मुंबईत राहून मला थोडेफार मराठी कळतं तेव्हा पुरे आता. " मी पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि कन्नड शिकणे बंद केले. सध्या मला २-४ तुळू वाक्ये आणि २-४ कन्नड वाक्ये सोडून काहीही येत नाही. त्यामानाने नवऱ्याला मराठी बऱ्यापैकी यायला लागले परंतु सुरुवातीला बऱ्याच गंमती व्हायच्या.

असेच एके दिवशी संध्याकाळी हापिसातून आल्यावर पोळ्या लाटत होते. नवराही हापिसातून परतला होता आणि म्हणाला 'पोळीबरोबर काहीतरी गोड हवं होतं. श्रीखंड असतं तर बरं झालं असतं. " त्यावेळेस आमचे घर बाजारापासून लांब होते. कोणतेही दुकान गाठायचे म्हणजे बाईकवरून जाऊन येऊन अर्ध्यातासाचा प्रवास. मी म्हटले "आता इतक्या संध्याकाळी जाऊन श्रीखंड घेऊन येणारेस का? " त्यावर त्याचे उत्तर असे की "काय श्रीखंड बाहेर विकत मिळतं? बाहेरचं कशाला हवं, बनव की घरी?"

आता पंचाईत होती. नुकतंच लग्न झालं होतं. फार काही येत होतं अशातलाही भाग नाही आणि असे सुरुवातीला नवरा काही करायला सांगत असेल तर नाही कसं म्हणायचं (नव्याची नवलाई) पण श्रीखंड कसं ताबडतोब तयार होणार? पुढचे आठवणारे संवाद असे -

"श्रीखंड असं ताबडतोब तयार होत नाही. शिरा वगैरे करेन. "
"नाही कसं? आहे काय त्यात करण्यासारखं? तुला करायचं नसेल तर मी करतो. "
"अरे त्यासाठी दही रुमालात बांधून रात्रभर लटकवायला हवं. पाणी काढून टाकण्यासाठी. "
"काहीही सांगू नकोस. दुधाचं श्रीखंड बनवतात. " हा माझ्या मराठीपणाचा अपमान होता.
"हो ना. आधी दुधाचं दही करतात, दह्याचा चक्का आणि नंतर श्रीखंड. "
"खोटं बोलू नकोस. तुझ्या घरी मी श्रीखंड खाल्लं आहे. तुझी आई तर झटपट बनवते. केळं, दूध आणि साखर तर हवी. "
"कप्पाळ! त्याला श्रीखंड म्हणत नाहीत. शीक्रण म्हणतात. ते मीही झटपट बनवते. "

असो. गेली १५ वर्षे शीकरण ही आमच्या घरातली फेवरीट डिश आहे आणि असे शाब्दिक गोंधळही अनेक आहेत. काही कन्नड/ तुळू शब्द मी आणि लेकीने सरळ आमच्या मराठीत घातले आहेत. जसे,

गडगडाट आणि विजा याऐवजी गुडगु-मिंचू हा शब्द. बाहेर केवढ्या जोरात गुडगु-मिंचूंचा खेळ सुरू आहे.
उशीला ते दिंबू म्हणतात. मला खूप आवडतो हा शब्द. त्यामुळे आमच्या घरात उशी हा शब्द बाद आहे. आम्ही डोक्याखाली दिंबू घेऊन झोपतो. वगैरे.

टिंगलटवाळी करताना आम्ही येथेच्छ घाटी, पांडू आणि आंडुगुंडू या शब्दांचा वापर करतो. अशावेळी मुलीसमोर हे शब्द वापरावे का असा प्रश्न होता परंतु काहीकाळाने तिच्यासमोर वापर झालाच. तिनेही तो गंमतीत घेतला. मी अर्धी कन्नड आणि अर्धी मराठी आहे म्हणजेच मी आंडूपांडू आहे असे ती गंमतीत सांगते.