कुमारजी,

ही कविता गझल फॉर्म मध्ये दिसत असली तरी, ही गझल म्हणून लिहिलेली नाही हे आधी मान्य करतो. मी ज्या बर्फाळ प्रदेशात राहतो, तिथे आता साठलेला बर्फ वितळून, वसंताची हलकीशी चाहूल लागली आहे. त्याचे वर्णन करणारी ही कविता आहे. त्यामुळे पहिल्या दोन ओळींकडे मतला म्हणून मी बघितले नाही.

' वृक्ष आहे नागवा' - हिवाळा सुरू होण्याआधी झाडांची पाने वाळून गळून जातात. त्यामुळे नुसत्या फांद्यांची झाळी असलेल्या वृक्षाला मी  ' नागवा' (नागडा / वस्त्रहीन) असे संबोधले आहे. हा नागडा वृक्ष त्याच्या पायाशी साठलेल्या पाचोळ्यावर उभा आहे असे ह्या ओळीमध्ये म्हटले आहे.  इतर ऋतूंमध्ये ह्या झाडाच्या फांद्यांवर पक्षी भिरभिरत असतात. त्यांच्या चिवचिवाटाच्या गाण्याची त्याला आठवण होत आहे.

शिशिरागम होता वाटले, संपले चैतन्य आता,       
वाळला कुसवा मृगाचा, जीव आज धरतो आहे   

निसर्गातील चैतन्य म्हणजे हिरवळ, पाने, फुले, पक्षी आणि प्राणी. हिवाळ्यात हे सर्व विरत जाते. म्हणून चैतन्य संपल्यासारखे वाटते. कुसवा म्हणजे गर्भाशय. आता हरणांना मे, जूनमध्ये पिल्लं होतील. म्हणून कुसवा आता हळूहळू जीव धरतो आहे. नोव्हेंबर पर्यंत मला अनेकदा हरणं दिसायची. हिवाळ्यांत ती दिसेनासी झाली. हा त्यामागचा अनुभव.

आपण  इतक्या आपुलकीने माझ्या कवितेची दखल घेतल्याबद्दल,धन्यवाद.

माझ्यासारखा देशाबाहेर राहणारा माणूस फक्त महाजालावर जे मिळेल त्याच्यातून शिकत असतो.

आपला,

अनुबंध