'थोपली जाते' असे वाक्य वाचून त्याचे मूळ हिंदी भाषेत असावे असे वाटणे सहज शक्य आहे. मला सुद्धा माझ्या बोलण्यातील अनेक शब्द/ वाक्य हिंदी भाषेच्या प्रभावामुळे आले आहेत याची जाणीव अनेक वर्षे नव्हती. पण ते लक्षात आणून दिल्यावर मी त्या शब्दांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक शब्द प्रांतीय मराठीने स्वीकारले आहेत असे लक्षात आले. त्याहीपेक्षा काही शब्द मराठीच आहेत असाही प्रत्यय आला. 'थोपणे' हा असाच एक शब्द असावा. मूळ शब्द 'थोप' हाच मराठी आहे. केवळ मोल्सवर्थ नाही तर इतर शब्दकोशातही तो सापडेल. प्र न जोशी यांच्या शब्दकोशात थोप, थोपणे, थोपाथोपी हे सर्व शब्द आहेत.
थोडेसे विषयांतर -

मराठी बोलणाऱ्या अनेकांना हिंदी येते म्हणून भारतात इतर भाषा बोलणारे अनेकजण त्यांच्याशी हिंदीत संवाद साधायचा प्रयत्न करतात. यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. केवळ लिपीमुळे हिंदीचा शिरकाव मराठीत झाला की मराठी माणसांनी ते शब्द स्वीकारले म्हणून झाला?
काही कारणांमुळे संवादाकरती तशी गरज निर्माण झाली म्हणून ते शब्द स्वीकारले गेले. यात काही कमीपणा नाही. संवाद हेच तर कोणत्याची भाषेचे ध्येय आहे ना? शिवाय असे झाले म्हणून मराठीचे नुकसान झाले असे मला वाटत नाही. भाषांची सरमिसळ होऊन भाषेचे नुकसान होईल की भाषेची व्याप्ती वाढेल?
अनेकदा आपल्या परिघात वावरणाऱ्या ठराविक लोकांच्या बोलण्यामुळे भाषेची व्याप्ती एवढीच आहे असा समज होऊ शकतो. शिवाय आपली शिक्षण पद्धती ( जी वेगळ्या प्रांतात थोडी वेगळी असेल पण एकंदरीत परीक्षा समोर ठेऊन तयार केलेली आहे हे नाकारता येणारच नाही) त्याला कारणीभूत असावी.
प्रत्येक वेळी एखादा शब्द घेऊन  त्याचे मूळ, त्याचे प्रत्यय लावून होणारे शब्द, वेगवेगळे अर्थ यावर चर्चा होत नाही अथवा माहिती दिली जात नाही. अशा प्रकारे खोलात शिरून मराठी भाषा शाळेत शिकवली जात नाही ( अपवाद जागरूक शिक्षक आणि पालक) . त्यामुळे  वाचन ,विविध प्रांताच्या बोली मराठीची ओळख आणि व्यक्तीगत आवड यानुसार आणि यावर प्रत्येकाची मराठी भाषा तयार झालेली असते.

दाक्षिणात्य हा शब्द प्रत्येकानुसार संदर्भाने बदलू शकतो याचा अनुभव अमेरिकेत भारतीयांमध्ये मिसळतांना आला. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्ये व तेथील माणसे आपल्याकरता 'नोर्थ इंडियन'  होतात, तसेच दक्षिणेकडील 'साऊथ इंडियन'. .. पण हाच नियम जर इतर राज्यातील लोकांनी वापरला तर महाराष्ट्राचे काय होईल? इथे भारतीयांमध्ये वावरतांना आपण नक्की कोण आहोत असा प्रश्न माझ्या मुलीला त्यामुळे पडतो.
भौगोलिक दृष्ट्या भारताच्या उत्तरेकडे असलेल्या  प्रांतासाठी महाराष्ट्र दाक्षिणात्य , तर भौगोलिक दृष्ट्या दाक्षिणात्यांकरता महाराष्ट्र उत्तरेकडील राज्य आहेः) हे वस्तुस्थिती आहे.  साता समुद्रापारहून आलेली इंग्रजी चालते ( का चालते ते माहिती आहेच)पण देशातल्याच भाषा / त्यांचा प्रभाव मात्र आपल्या भाषेवर नको असे मत अनेकदा दिसते ते सुद्धा मला पटत नाही.