कथा आवडली, परंतु कथेखाली कथेचे तात्पर्य स्पष्टपणे लिहिलेले नसल्याकारणाने यातून नेमका काय बोध घ्यावा हे गूढ लक्षात न येऊन संभ्रम निर्माण झाला.  तात्पर्य दिले असते तर अतिशय प्रभावी बोधकथा होऊ शकली असती; तूर्तास स्पष्ट तात्पर्याअभावी गूढकथा झाली आहे. निरनिराळ्या प्रकारचे (आणि प्रसंगी परस्परविरोधीही) संभाव्य बोध सुचले. पैकी नेमका कोणता अभिप्रेत आहे (अथवा याहून वेगळा कोणता अभिप्रेत आहे अथवा यातून कोणताही बोध घेणे अपेक्षित नाही) याचा कृपया खुलासा व्हावा.
(अ. ) लॉटरीचे तिकीट म्हणून काहीतरी असते,
(ब. ) त्याचे निकाल वर्तमानपत्रांतून छापून येतात,
(क. ) असे एक तिकीट आपल्याकडे आहे, आणि
(ड. ) त्याचा निकाल असलेला वर्तमानपत्राचा तुकडाही आपल्याकडे आहे

याचे केवळ ज्ञान नसल्याने एक विजेते लॉटरीतिकीट जवळ असूनही 'ति'ने ते फेकून दिले. ते ज्ञान असते तर त्या पाकिटातून मिळालेल्या नोटांपेक्षा खूप मोठा धनलाभ 'ति'ला झाला असता. (यातूनच योजकस्तत्र दुर्लभः हा बोनस बोधसुद्धा होतो. )
(अ.) 'ती' पोटभर मिसळ आणि बटाटेवड्यांचा आनंद उपभोगू शकत आहे.
आपल्याकडे भरपूर पैसे आहेत याचे जर 'ति'ला ज्ञान असते, तर:
(१) (पार्किन्सनच्या नियमाप्रमाणे) ते कसेकसे खर्च करावेत, आणि
(२) ते चोरांपासून सुरक्षित कसे ठेवावेत, शिवाय
(३) इनकम टॅक्स, तो टाळण्याकरिता (किंवा किमानपक्षी कमी करण्याकरिता) गुंतवणूक, वगैरे वगैरे भानगडी
या चिंतांपायी 'ति'ला मिसळ आणि बटाटेवडे गोड (किंवा खरे तर तिखट) लागले नसते. शिवाय नवश्रीमंतीच्या आपल्या या नव्या 'स्टेटस'(मराठी?)च्या जाणिवेपायी कदाचित 'ति'ला रस्त्यावरील मिसळ आणि बटाटेवडे खाणे कमीपणाचेही वाटले असते.
(ब. ) ते लॉटरीचे तिकीट आपल्याकडे आहे, आणि ते दुर्लक्षिल्यामुळे आपण काहीतरी मोठे गमावत आहोत हे 'ति'च्या गावीही नसल्याकारणाने ते गमावल्याचे दुःखही 'ति'ला नाही. आणि त्याचमुळे 'ती' निर्विकार आहे, आणि आजच नव्हे, तर उद्याही (नोटांचे पैसे शिल्लक राहिले तर) आनंदाने मिसळ आणि बटाटेवडे खाऊ शकेल. (उलटपक्षी उद्या यदाकदाचित आपण काय गमावले हे जर 'ति'ला कळले, तर उद्याच काय, पण कदाचित उरलेल्या आयुष्यातसुद्धा 'ती' पुन्हा आनंदी होऊ शकणार नाही.)
तूर्तास एवढेच सुचले. (सोने आणि माती आम्हा समान ते चित्ती आणि मार्क्सवादाशी निगडित क्षमतेनुसार काम आणि गरजेनुसार पैसा या तत्त्वांचा या कथेशी दूरान्वयाने काही संबंध लागतो का ते तपासत होतो, परंतु (१) या कथेतून हे बोध निघू शकत नाहीत, आणि (२) काही संबंध लागत असेलच तर ही कथा या बोधांच्या - विशेषतः उपरोल्लेखित मार्क्सवादी तत्त्वाच्या - काहीशी विरोधातच जाते, असे प्राथमिक तपासणीवरून वाटले. चूभूद्याघ्या. )