गीताजी आणि हरिभक्तजी

आपण अत्यंत निर्वैयक्तिकपणे सांख्ययोग आणि भक्तियोगाची संकल्पना समजावून घेवू

१) तुम्ही आहात म्हणून सर्व काही आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. गुरू, देव, श्रद्धा, अश्रद्धा सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. समजा तुम्ही देव किंवा गुरू मानत असाल आणि मी मानत नाही पण मी स्वतःला नाकारू शकत नाही कारण नाकारायला सुद्धा मी हवाच. हा मी आपल्या सगळ्यांचा एक आहे

२) सांख्य (किंवा ज्ञान) योगाचे म्हणणे आहे की हा मी जर एकच आहे तर मग भक्ती कोण आणि कुणाची करणार?  ह्या मी आहे मध्ये तुम्ही स्थिरावलात की तुमच्या लक्षात येते की मी असा कुणी नाही फक्त एक निर्वैयक्तिक जाणिव आहे जी सनातन आणि चिरकाल आहे; बस तुमचे काम झाले! तुम्हाला सत्याचा बोध झाला!

३) भक्तीयोगाचे म्हणणे असे आहे की तुम्ही स्वतःला जो मी समजतायं ती व्यक्ती आहे अशा व्यक्तीला कोणावर तरी श्रद्धा ठेवायला हवी, ही श्रद्धा त्याला सत्याच्या बोधाप्रत नेईल. इथे गफलत आहे कारण ज्याला तुम्ही देव किंवा गुरू मानणार तो प्रार्थमिक होतो आणि तुम्ही नंतर येता. वास्तविक तुमचा गुरू किंवा देव तुम्ही मानला म्हणून असतो. 

भक्तीमार्गात तुम्ही आणि तुमची कल्पना यात अंतर निर्माण होते. आपल्याला वाटते की कृष्ण पूर्ण पुरुष आणि आपल्याला अजून बरीच मजल गाठायची आहे; इथे तणावाला सुरुवात होते कारण अस्तित्वात वेळ नाही, वेळ ही माणसानी स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केलेली कल्पना आहे. एकतर आत्ता या क्षणी तुम्ही आणि कृष्ण एक आहात किंवा मग कधीही एक होऊ शकणार नाही कारण ह्या घटनेचा वेळेशी काहीही संबंध नाही. मूळात ही घटनाच नाही ती स्थिती आहे त्यामुळे ती आत्ता या क्षणीच असायला हवी आणि आहे.

३) आता हे पण बघाः  सर्वानुमते अस्तित्व एक आहे. याचा अर्थ असा आहे की आकार जरी वेगवेगळे दिसत असले तरी त्यांच्या आत आणि बाहेर असलेला निराकार एक आहे. ही जर परिस्थिती आहे तर मग आकार मध्ये आणून फार मोठी चूक होते कारण आपण स्वतःला आकारच मानत असतो आणि तोच तर मुख्य पेच असतो . सांख्याचे म्हणणे आहे की हा निराकार जाणला की समजते आपण ही मूळात निराकारच आहोत.

४) मी जरी ज्ञानेश्वर, कृष्ण, ओशो, निसर्गदत्त महाराज, बुद्ध, एकहार्ट यांचे उल्लेख करत असलो तरी यातल्या एकालाही मी भेटलेलो नाही आणि मी कुणाकडूनही मार्गदर्शन घेतलेले नाही. मी कुणाचा सरसकट पुरस्कारही करत नाही कारण मग ते कसे बरोबर आहे ह्याच्या समर्थनात वेळ जाईल.  मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की ज्या सगळ्यांना सत्य समजले त्यांचे म्हणणे एकच आहे की आपण स्वतःला आकार समजतो आहोत पण मूळात आपण निराकार आहोत आणि हा बोध  हीच मुक्ती आहे.

संजय