संजयजी नि प्रतिपादन केलेला मार्ग सद्योमुक्तीचा. त्यांचे सुसंगत आणि तर्कशुद्ध विचार वाचत असतानाच ती मिळायला हवी. या मार्गानुसार ती तत्क्षणी मिळायला हवी, नाहीतर कधीच नाही. स्वाभाविक मानवी मर्यादांचा रास्त विचार करता अशी सद्योमुक्ती मिळणे/ मिळवणे दुरापास्तच. हाच एक मार्ग सयुक्तिक, आणि बाकीचे भ्रामक असा आग्रह धरणे योग्य वाटत नाही.
गुरूपदिष्ट राहून केलेली सेवा/ साधना/ उपासना, नित्य उपासना/ अनुष्ठान, जप, चित्तशुद्धी, नामस्मरण, कुंडलिनी शक्तिपात असे अनेकविध क्रममुक्तीचे मार्ग आहेत. ते ही अनुभवसिद्धच आहेत. पैकी प्रत्येक मार्गाचा अनुभव व्यक्तिगत पातळीवर घेता येत नसला, तरी मी अनुभवलेलेच खरे, बाकी गफलत अशी भूमिका घेण्याचे कारण नाही.
आपल्या मार्गावरून निष्ठेने वाटचाल करत असताना (किंवा पोचल्यावरही) इतरांबद्दल लवचिक, उदार भूमिका ठेवणे श्रेयस्कर. भक्ताला ते सहज साध्य होते असावे उदा. पावस चे स्वामी स्वरूपानंद (नाथपंथी सोहम सिद्ध) सहजच जे. कृष्णमूर्तींचा उल्लेख अत्यादराने करत. जे. कृष्णामूर्तींचा परंपरेबद्दलचा कडवटपणा आणि अनादर कधीच निवळला नाही. भक्तीहीन, निव्वळ विचारांनी साधलेल्या choiceless awareness चीच ही मर्यादा म्हणावी का?