जगाची जेवढी लोकसंख्या आहे तितके मार्ग असू शकतात. विवेकानंदांनीही हे अमेरिकेतील भाषणात मान्य केलेले आहे, कारणे दिलेली आहेत. सर्व संतांना हे मान्य असते म्हणूनच त्यांच्या जीवनात विलक्षण सहिष्णुता आढळून येते.

संजय क्षीरसागर यांनी त्यांचा मार्ग शोधून काढला आहे असे त्यांचे म्हणणे मी म्हणूनच मान्य केले आहे. मात्र त्यांनी सुचविलेलाच मार्ग हा एकमेव आहे आणि म्हणून तोच मी अवलंबिला पाहिजे असे ते म्हणू लागले तर मात्र त्यांना काहीच कळलेले नाही असे म्हणावे लागेल. त्यांच्या लेख क्रमांक १२ (अस्तित्वाशी संवाद) ला मी प्रतिसाद दिला होता. त्या प्रतिसादाला त्यांनी उत्तर दिले होते पण त्यांनी दिलेल्या उत्तरात मला तरी असहिष्णुता आढळून आली नाही. किंवा मीही त्यांचाच मार्ग अनुसरावा असा आग्रह त्यांनी धरलेला दिसला नाही.

मला नामस्मरणाचा मार्ग आवडतो. त्या मार्गानुसार ध्यान, धारणा, समाधी हा क्रम वेगळ्या पद्धतीने  व वेगळ्या क्रमाने येतो. त्यांचे अर्थही थोडेसे वेगळे आहेत.  पण पातंजल योगानुसार त्यांनी विवेचन केलेले आहे असे स्पष्ट केलेले असल्यामुळे मला त्यांचे स्पष्टीकरण वावगे वाटले नाही. शेवटी आपण जो मार्ग अनुसरत असतो त्यासाठी जे उपयोगाचे असेल ते घेणे हे आपले काम.

सद्गुरू वामन राव पै यांचे सर्व ग्रंथ मी वाचलेले आहेत. मला त्या ग्रंथातून खूप मौलिक गोष्टी शिकता आल्या. अनेक चुका सुधारता आल्या. साधनेत प्रगतीपण झाली.  पण त्यांच्या अनेक गोष्टी मला पटत नाहीत. (उदाहरणार्थ अनाधिकारी माणसाला काही गुह्ये सांगू नयेत हा नाथसंप्रदायातील परंपरागत नियम. पण हा नियम त्यांनी मोडला असल्याचे त्यांनीच त्यांच्या ग्रंथात स्पष्ट केले आहे. )  अनेक वेळेस तर त्यांचे प्रतिपादन वेद व उपनिषदांनी जे सांगितले त्याच्या विरोधात वाटते.  गुरूमंत्रात सद्गुरू आपली शक्ती घालू शकत नाहीत हे त्यांचे विधान तर माझ्या अनुभवाच्या विरोधातीलच वाटते. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे व आपल्याला जेवढे उपयोगाचे तेवढे घेणे हेच श्रेयस्कर. असो.

श्री. संजय क्षीरसागर यांनी त्यांच्या लेखमालेच्या सुरवातीलाच (पहिल्या लेखातील मुद्दा क्र. ३) एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे. मी माझे म्हणणे फक्त माझ्या पद्धतीनेच मांडू शकेन किंवा उकल करू शकेन. मला कॉंप्रोमाईज करता येणार नाही. याकडेही लक्ष वेधू इच्छितो.

अनेक गोष्टी मांडता येण्यासारख्या आहेत.

कोणी मराठीप्रेमी आहे. कोणी शुद्धलेखनप्रेमी आहे. कोणी गणितात देवनागरी आकडे वापरावेत की इंग्रजी याबाबत संवेदनशील आहे. कोणाला शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणायचा आहे. कोणाला लिपी कोणती असावी याबाबत विशेष आस्था असते. पण यासाठी संशोधकाची भूमिका घेऊन त्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्चायला लागते तेव्हा काही तरी ठोस भूमिका घेता येते असे वाटते.