१)"याचा अर्थ गीता दातार (प्रातिनिधिक व्यक्ती) आणि 'या क्षणी इथेच' असणाऱ्या चिरंतन सत्यामध्ये श्री. वामनराव पै (प्रातिनिधिक गुरू) आणि चित्तशुद्धी सारख्या काल्पनिक धारणांची दुर्दैवी गफलत आहे. ती दूर केल्याविना गत्यंतर नाही"
अत्यंत योग्य निष्कर्श : साधक आणि गुरु किंवा देव आणि भक्त आणि मग त्यांना जोडणारी साधना यामुळे वेळ निर्माण होते आणि अस्तित्वात वेळ नाही त्यामुळे जोपर्यंत तुम्ही गुरू किंवा देव ही तुमची कल्पना सोडत नाही तोपर्यंत तुमची जाणिव उन्मुखच रहाणार; तुम्ही गुरू किंवा देव ही कल्पना आहे हे ज्या क्षणी मान्य कराल त्याक्षणी तुमची जाणिव तुमच्याप्रत येते. तुमच्या लक्षात येतं की द्वैत नाही; या क्षणी आपण आकार आणि निराकार दोन्हीही आहोत आणि तरीही एकच आहोत! ही स्वतःची स्वतःशी एकरूपता आनंद आहे!
२) "आपण मांडत असलेला सांख्य योग पूर्णपणे अभिनव योग आहे का? असा तांत्रिक प्रश्न विचारल्याबद्दल क्षमस्व. तशी सत्याला परंपरेची आणि लेबल ची गरज नसतेच."
हरिभक्तजी तुम्ही माझा पहिला लेख वाचा. सत्य हा ज्याला समजलं त्याचा उद्घोष आहे! ज्याला कळेल तो त्याची अभिव्यक्ती देईल, म्हणून तर सत्य एक असले तरी प्रत्येकाची ते मांडण्याची कला न्यारी असते. जसं एकदा तुम्हाला गाता यायला लागलं की तुम्हाला कळतं की संगीत म्हणजे फक्त गोडवा आहे तो मी वेगवेगळ्या गाण्यातून दाखवू शकतो; आता मला अमका श्रेष्ठ की तमका श्रेष्ठ याचा उहापोह करण्यात स्वारस्य राहत नाही; मी माझं गाणं गाऊ लागतो.
मी आधी लिहील्याप्रमाणे मला कुणाचेही वैयक्तिक मार्गदर्शन मिळाले नाही त्यामुळे जरी मी ओशोंचे वाचले आणि एकले असले तरी मी त्यांचा फॉलोअर नाही. मी मला योग्य वाटेल तिथे ओशोंची चूक वाटत असेल तर तसे म्हणू शकतो; तुम्ही ओशों विषयी काहीही मतं व्यक्त केली तर मला त्याचा अजिबात राग येत नाही. मला निसर्गदत्त महाराज किंवा एकहार्ट टोले बद्दल आदर आहे पण तुम्ही म्हणालात की आम्ही ही नांवे सुद्धा एकली नाहीत तर मला त्यात अपमान वाटून घ्यायचे काही कारण वाटत नाही.
माझा सांख्ययोग असा काही नाही. मला सत्याची अभिव्यक्ती करण्यात आनंद वाटतो म्हणून मी लिहीतो. तुम्ही माझ्या आनंदात सहभागी झालात तर तुम्हालाही सत्य समजण्याची शक्यता निर्माण होते इतकेच.
३) "संजयजी नि प्रतिपादन केलेला मार्ग सद्योमुक्तीचा. त्यांचे सुसंगत आणि तर्कशुद्ध विचार वाचत असतानाच ती मिळायला हवी. या मार्गानुसार ती तत्क्षणी मिळायला हवी, नाहीतर कधीच नाही. स्वाभाविक मानवी मर्यादांचा रास्त विचार करता अशी सद्योमुक्ती मिळणे/ मिळवणे दुरापास्तच. हाच एक मार्ग सयुक्तिक, आणि बाकीचे भ्रामक असा आग्रह धरणे योग्य वाटत नाही".
हरिभक्तजी तुम्ही इतके बरोबर चालले असताना परत गडबड केलीत. मुक्ती मिळवायची नाही, ती आहेच!
मी तुम्हाला अष्टावक्र या महान सांख्ययोग्याचे एकच वाक्य सांगतो : ते म्हणतात ' तुमची मान्यता हेच तुमचे बंधन आहे" एका वाक्यात त्या माणसानी सगळे अध्यात्म एकवटले आहे.
३) "आपल्या मार्गावरून निष्ठेने वाटचाल करत असताना (किंवा पोचल्यावरही) इतरांबद्दल लवचिक, उदार भूमिका ठेवणे श्रेयस्कर. भक्ताला ते सहज साध्य होते असावे उदा. पावस चे स्वामी स्वरूपानंद (नाथपंथी सोहम सिद्ध) सहजच जे. कृष्णमूर्तींचा उल्लेख अत्यादराने करत. जे. कृष्णामूर्तींचा परंपरेबद्दलचा कडवटपणा आणि अनादर कधीच निवळला नाही. भक्तीहीन, निव्वळ विचारांनी साधलेल्या choiceless awareness चीच ही मर्यादा म्हणावी का? "
मला पेच आत्ता सोडवायचा आहे, तुम्हाला सावकाश सोडवायचा आहे हा आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतला फरक आहे. तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटते मला 'स्व' महत्त्वाचा वाटतो. मला हे पोहोचले होते का? ते किती पोहोचले होते? ते असे वागले म्हणजे जास्त पोहोचले होते, हे असे वागले म्हणजे कमी पोहोचले होते; यांचा मार्ग काय होता आणि ते कसे पोहोचले? अशा गोष्टीत अजिबात स्वारस्य नाही कारण ती माहिती आहे, सत्य नाही!
शक्तीपात, कुंडलिनी वगैरे सगळे अनुभव आहेत ते असतील किंवा नसतील त्यानी काहीही फरक पडत नाही; आपला शोध ज्याला अनुभव येतो त्याचा आहे; आणि तो आपल्या सर्वांचा एक आहे; त्यामुळे अनुभवाचा फरक आपल्याला एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही.
मला वाटतं माझं म्हणणं फार साधं आहे ते असं की आपण सर्व पोहोचलेलोच आहोत, मला हे समजलं आहे, तुम्हाला ते समजलेलं नाही पण म्हणून तुम्ही पोहोचलेले नाही हे मी मान्य करायला तयार नाही. तुम्ही जरी स्वतःला जरी निराकार मानत नसाल तरी त्यानी तुमचे मूळ स्वरूप काही बदलत नाही कारण ते तुमच्या मान्यतेवर अवलंबून नाही. आता या पेक्षा मोठे औदार्य मी काय दाखवू शकतो?
(मी हा प्रतिसाद लिही पर्यंत शाम भागवताजी नि प्रतिसाद लिहीला होता, मला त्यांच्या समजेचं कौतुक वाटतं. मी वर जे काही लिहीलं आहे ते त्यानां आणि अर्थात गीताजीना ही निश्चीत उपयोगी होईल)
संजय