१) "मला वाटते की मी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करणारा एक सामान्य माणूस आहे. आणि म्हणूनच इतर जण असामान्य असण्याची शक्यता मी नेहमी गृहीत धरत असतो.....आपण श्री. संजय क्षीरसागर यांनी विवेचन वाचले पण त्यांनी पूर्वजन्मात केलेली साधना आपण जाणू शकत नसल्यामुळे ते विवेचन आपल्याला पूर्णपणे गोंधळात टाकते"
तुम्ही मला मोठा करू नका, आपण सगळे सारखेच आहोत. प्रत्येकजण जीवनाचा पेच सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. मी सुद्धा पूर्णपणे गर्तेत सापडलो होतो आणि बाहेर पडायचा मार्ग शोधत होतो. माझी पूर्व जन्मीची साधना वगैरे काही नाही, मला कालचे आज आठवायचे झाले तरी प्रयास वाटतो. मला एकच कळले आहे की शरीर जन्मते आणि मरते आपण नाही त्यामुळे मागचा जन्म वगैरे काही नाही.
मूळात वेळ हीच जर कल्पना आहे तर मग एकच क्षण उरतो आणि तो म्हणजे आत्ता! तुम्ही मागचं पुढचं काहीही काढू नका. या क्षणी तुम्ही समोर बघाः निराकार हजर आहे! आता ह्या बोधात स्थिर रहा मग तुमच्या लक्षात येईल की निराकार फक्त समोर नाही तो आजूबाजूलाही आहे, तो शरीराच्या आरपार गेला आहे. हाच बोध स्थिर ठेवा तुमच्या लक्षात येईल की निराकाराने निरकाराला जाणले! आपण मूळात निराकार आहोत, तुमचे काम झाले. आता या बोधाची विस्मृती करू म्हंटले तरी होत नाही, तुम्ही अनेक वेळेला चुकाल पण परत मूळ पदावर याल, सगळा मिळून एवढाच हिशेब आहे!
२) "मी ते सर्व विवेचन मान्य केले कारण ते मला पटले आहे. पण त्या मार्गाने जायचे की नाही हे कर्मस्वातंत्र्य मला आहे व ते स्वातंत्र्य मी उपभोगणारही आहे. शिवाय त्याला श्री. संजय क्षीरसागर यांची काहीही हरकत नसणार आहे किंवा ते त्याबद्दल एक चकार शब्द बोलणार नाहीत ही माझी खात्री आहे. कारण मी कोणता मार्ग स्वीकारतो यावर त्याची अनुभुती अवलंबूनच नाही. मग आपण का बरे त्रास करून घ्यायचा?"
एकदम बरोबर! पण इथे मला ओशोंची दोन वाक्ये उधृत करावीशी वाटतात : एक : ते म्हणतात 'समझ आचरणमे बदल जाती है'. मला जेंव्हा कळलं की मी निराकार आहे तेंव्हा सगळं जग जरी म्हणालं की तुला समजलं नाही तरी मी ते मान्य करणार नाही. तुम्ही मला कसं ही पकडायचा प्रयत्न करा मी सापडणार नाही! तुम्हाला मी म्हणतो ते समजलं आहे पण तुम्ही ते सर्वस्वी मान्य करत नाही म्हणून तुम्हाला वाटतयं की अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, तुम्हाला मजा वाटते का नाही हे तुम्ही ठरवा आणि चालू द्या; तुम्हाला समजलं नाही म्हणून मी चिडून काय उपयोग? माझ्या बरोबर चोवीस तास असणाऱ्या माझ्या बायकोला तरी कुठं समजलयं? आणि कळस म्हणजे मला समजलयं हे ही तिला मंजूर नाही, आता बोला!
ओशोंच दुसरं वाक्य आहेः 'समझ की कमी साधनासे पूरी करनी पडती है!' ( दोन्ही वाक्ये : अष्टावक्र महागीता)
मला काय वाटतं ते मी सांगतो : शांतता मूळ आहे ध्वनी हे प्रकटीकरण आहे, ज्या क्षणी आतली बडबड थांवेल (मग ते उधाण झालेलं मन असो की नाम असो) त्या क्षणी तुम्हाला कळेल की अरे! आपण प्रकटी करणापूर्वी पासून होतो, ध्वनी निर्माण झाल्यामुळे तिकडे लक्ष वधलं गेलं आणि स्वतःला विसरलो होतो. आपण मूळातच शांतता होतो, ध्वनी (किंवा नाम) शिकायला लागते, शांतता नाही!
संजय