१) प्रथम तुम्हाला जे वाटते आहे की मी तुम्हाला माझा मार्ग अवलंबा असे सांगतो आहे तर ते तसे नाही. माझा असा कोणताही मार्ग नाही कारण माझ्या अनुभवाने मार्ग आणि मुक्काम एकच आहे आणि तो तुम्ही आहात! त्यामुळे मी  फक्त मला जे समजले आहे ते तुमच्या समोर मांडतो आहे, तुम्हाला समजलं, पटलं तर आनंद आहे, नाही पटलं तरी वैषम्य नाही.

२)"मी खूप दुःखी आहे किंवा गर्तेत सापडलो आहे व त्यातून बाहेर पडण्यासाठी मी नामस्मरण करत आहे असे मी कधीही म्हटलेले नाही. मी निराकार मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे असेही कधीही म्हटलेले नाही. माझे सगळे ठीक चाललेले आहे व हे चाललेले असताना नामस्मरण करण्यात आनंद वाटतो म्हणून मी नामस्मरण करतो इतकेच"

मी माझा अनुभव सांगीतला, मी गर्तेत होतो आणि पेच सोडवला आहे. तुम्ही गर्तेत आहात म्हणून नामस्मरण करता आहात असे मी म्हंटले नाही.

मला मी निराकार आहे हे कळल्यावर स्वच्छंद मिळाला, पूर्ण मोकळीक लाभली, निसर्गाची बुद्धीमत्ता अनायास उपलब्ध झाली. मला हा आनंद वाटावासा वाटतो तेंव्हा मी गाणं वाजवतो, बायको किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो, पोहायला जातो, टेबल टेनीस खेळतो किंवा इथे लिहीतो.

३) "मला ताबडतोब निराकार दिसला पाहिजे यासाठी तुम्ही का बरे धडपड करत आहात?  मी माझ्या पद्धतीने निराकार मिळवणार आहे हे समजल्यावर माझे हे स्वातंत्र्य मान्य करून त्यासाठी मला शुभेच्छा देऊन हा विषय संपवावा असे तुम्हाला का बरे वाटत नाही आहे"

असे नाही. मी काहीही धडपड करत नाही मी फक्त  लिहीतो आणि तुमच्या प्रतिसादांना उत्तरे देतो.

एक गोष्ट मात्र जरूर आहे की मला मानवी मनाबद्दल प्रचंड कुतुहल आहे आणि निराकार हा माझा छंद आहे. त्यामुळे तुम्ही म्हणत असाल की नामस्मरणानी निराकार गवसतो तर मी उत्सुक होतो, यात तुम्ही जर निःशंक असाल तर तुम्हीही म्हणाल की हो, हा असा गवसतो, मग मला आणखी उलगडा होतो की अरे हा मनाचा नवा पैलू गवसला! 

४) "मी तुमच्यावर तसे तुमच्या विवेचनावर तसेच तुम्हाला निराकार समजलाय ह्यावर पूर्ण विश्वास ठेवत आहे. कारण अविश्वास ठेवण्यासाठी मला काही कारणच सापडले नाही आहे. माझा हाच स्वभाव किंवा माझी हीच धारणा मला नामस्मरण करणाऱ्या संताच्या वचनावर दृठ श्रद्धा ठेवायला मदत करत आहे. बाकी काही नाही. माझे एवढेच म्हणणे आहे की मला मी निवडलेल्या मार्गाने निराकार मिळावा. त्याला तुमची काहीच हरकत नसावी. तसेच तुमच्याच पद्धतीने मी निराकार मिळवला पाहिजे असा तुमचा आग्रह नसावा"

माझा काहीही आग्रह नाही. तुम्ही सर्व बाजूनी विचार करता असे दिसते म्हणून मला फक्त मनोमन कुतुहल आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तेंव्हा तुम्ही खरं तर स्वतःवरच विश्वास ठेवत असता कारण माझं म्हणणं तुम्हाला पटलेले असत! मी काही तुम्हाला मार्ग परावृत्त करण्याच्या मागे नाही कारण त्यात माझा काय फायदा? आणि मला माना असे सुद्धा म्हणत नाही कारण मग मी तुमच्या मान्यतेवर अवलंबून राहीन. मला फक्त प्रक्रिये बद्दल कुतुहल आहे, तुम्हाला सांगावेसे वाटले तर जरूर सांगा.

संजय