खूप दिवसांनी मनोगतला भेट दिली आणि खूपच धमाल आली. सुधीरजींचा अनुभव आणि शरदजींचा चुटका वाचून खूप हसू आले. यात कोणाची चेष्टा करण्याचा मुळीच हेतू नाही. त्यामुळे खरच छान वाटले. कारण या निर्मळतेनेच आनंद मिळतो. मी मूळची मुंबईची (ठाण्याची) आहे. माझे सासर मात्र विदर्भात नागपूरला आहे. मी जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत ठाण्याला जात असे तेव्हा माझा मुलगा 'करून राहिलो' 'बोलून राहिलो' असे बोलायचा. त्याला तिकडे खूप हसायचे. पण चेष्टा करण्याचा हेतू नसायचा.  आता सर्वांना सवय झाली आहे. इकडे पण कोथिंबिरीला 'सांबार' म्हणतात. एकदा माझे लग्न जमल्यावर मी माझ्या नणंदेकडे कल्याणला गेले होते. माझा नवरा आला होता. त्याने एका कुंडीकडे बघून नणंदेला विचारले, "यात काय सांबार लावले आहेस का? " मी चक्रावले. सांबार कुंडीत कसे लावणार? मग माझ्या नणंदेने सांगितले की म्हणजे कोथिंबीर. मी घरी आल्यावर सर्वांना ही किस्सा सांगितला आणि आम्ही सगळे मनसोक्त हसलो.