"माझा प्रश्न सुखाचा नव्हताच. प्रश्न कर्माचा आहे. सुखी माणूस कर्म सोडून देतो का?"
कर्म दोन प्रकार होऊ शकते : एक अनिवार्यता : जे आपण पैसे मिळवण्यासाठी किंवा गृहिणी पर्याय नाही म्हणून करते किंवा दोन : आता संपत्ती भरपूर आहे किंवा घरकाम संपले आहे पण स्वस्थ बसले की अस्वस्थता वाटायला लागते म्हणून केलेले कर्म. गिर्यारोहकाचे कर्म दुसऱ्या प्रकारात येते.
तुम्ही गिर्यारोहकाला विचारा तू घरी का थांबू शकत नाहीस तर तो म्हणेल की मला गिरीशिखरे बोलावतात! आता गिरीशिखरे कशाला बोलावतील? त्याला घरी अस्वस्थ वाटायला लागतं हे खरं कारण आहे! गिर्यारोहण ही त्यानी त्याच्या अस्वस्थतेला करून दिलेली (समाजमान्य) वाट आहे. गिरीशिखरावर तुम्ही किती वेळ थांबणार? परत आलं की नोकरी किंवा धंद्यातली अस्वस्थता की मग परत गिरीशिखरं बोलवायला लागतात. तुला कल्पना नसेल, एखादी मोहीम अयशस्वी झाली की त्यांची काय घोर निराशा होते! याचा अर्थ काय तर कर्म न करण्याचा विकल्प उपलब्ध नव्हता; मोहीम फत्ते होण्यावरच सगळा आनंद अवलंबून होता. आणि मोहीम फत्ते होते तो फक्त एक क्षण असतो! आणि त्याहून मजा म्हणजे, त्या क्षणी आनंद का होतो तर एक क्षण हा होईना अस्वस्थता संपलेली असते!
मी जे कर्म म्हणतो ते कर्म 'केले तरी चालेल आणि नाही केले तरी चालेल' असे असते; हा कर्म न करण्याचा विकल्प सुख आहे. सगळ्यांचा एक फार मोठा गैरसमज आहे की काम न करणे म्हणजे अध्यात्म. तसे नाही, कामाची अनिवार्यता संपणं म्हणजे अध्यात्म. ही अनिवार्यता संपणं हे तुम्हाला निराकार गवसल्यामुळं होतं कारण निराकार अकर्ता आहे. तुम्ही कोणतंही काम मजा म्हणून करू शकता; कामाची फलश्रुती तुमच्यावर काहीही परिणाम करू शकत नाही; आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही केंव्हाही काम थांबवू शकता!
संजय