... एव्हरेस्टवर जा, मंगळावर जा, मसणात जा नाहीतर खड्ड्यात जा, जाल ते आनंदी होण्यासाठी म्हणून जाऊ नका, तर आनंदी आहात म्हणून जा, निर्विकारपणे - केवळ जावेसे वाटले (हुक्की आली म्हणा ना!) म्हणून - जा, असे काही म्हणायचे आहे का? तसे असल्यास कदाचित पटण्यासारखे आहे.

पण मुळात हिलरी काय किंवा चंद्रावर किंवा मंगळावर जाऊ पाहणारे काय, ही सर्व मंडळी स्वस्थतेच्या शोधात, अस्वस्थतेपासून मुक्ती म्हणून तेथे जाऊ पाहतात हे पटत नाही. (कसली अस्वस्थता? गृहकलह? कर्जबाजारीपणा? हापिसात उशिरा पोहोचल्याबद्दल बॉस खेकसतो म्हणून? नेमकी कशापासून पळून जाऊ पाहतात बरे ही मंडळी? आणि पळूनच जायचे असेल, अधिक पळून जाऊन स्वस्थता मिळणार असेल, तर मग योजना आखताना परतीच्या योजना तरी का आखत असतील बरे? त्यामुळे स्वस्थतेचा शोध हे कारण खचितच नसावे. ही मंडळी हे सर्व उद्योग आनंद मिळवण्यासाठी म्हणून करत नसावीत, तर ती मुळातच आनंदी असावीत - तसे नसण्याचे काहीच कारण दिसत नाही - आणि आनंदी आहेत म्हणून, आनंदी राहून हे सर्व करत असावीत, असे वाटते.)

(चंद्रावर किंवा मंगळावर जाण्याकरिता) इतरांना कामाला लावण्याच्या बाबतीत बोलायचे झाले, तर या इतरांना कोणी जबरदस्तीने वेठीस धरून कामाला लावले असावे असे वाटत नाही. अवकाशसंशोधन किंवा चांद्रयानमोहीम आखणे हे ज्यात कोणताही सोम्यागोम्या केवळ कोणाच्यातरी जबरदस्तीने किंवा पोटाची खळगी भरण्यास्तव नाइलाजाने काम करू शकेल असे क्षेत्र नक्कीच नसावे. त्यामुळे हे इतर या क्षेत्रात रोज काम करणारे तज्ज्ञ असावेत; आपापले उद्योग सोडून केवळ कोणीतरी कामाला लावले म्हणून निश्चितच काम करत नसावेत. शिवाय, ते बिनपगारी किंवा ताशी दरावर वेठबिगारी करत नसावेत. त्यांना योग्य तो पगार मिळत असावाच. ते आनंदी राहून, हे काम आवडते म्हणूनच करत असावेत. त्यामुळे 'इतरांना कामाला लावण्या'चा मुद्दा येथे अनाठायी वाटतो.
 
बाकी शून्य गुरुत्वात पेन्सिल न वापरता साडेतीन लाख डॉलर खर्च करून बनवलेले बॉलपेन का वापरायचे हे बहुधा बिनहवेच्या झाडूने बाळंतपण केल्याशिवाय उमगत नसावे. (याचा अर्थ लक्षात न आल्यास गरज भासल्यास तो चित्रपट पुन्हा पहावा.) असे बाळंतपण मी केलेले नाही, आपणही केलेले नसावे, त्यामुळे त्यावर याहून अधिक चर्चा आपण करणे व्यर्थ आहे. केवळ 'जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे' एवढेच म्हणून तो मुद्दा मी आनंदाने सोडून देतो. माझ्या लेखी यात खरा प्रश्न एवढाच आहे, की शून्य गुरुत्वात असे बॉलपेन वापरणे हे कदाचित ठीक असेलही, पण म्हणून पृथ्वीच्या पाठीवरही असे बॉलपेन वापरत राहण्यात श्रेष्ठत्व का मानावे? (अर्थात हा प्रश्न प्रस्तुत चर्चेकरिता अवांतर आहे.)

चौथा मुद्दा म्हणजे, "मी माझ्या लेखनातून ज्याना ते पटेल त्यांना जीवन सहज, सोपे आणि आनंदानी कसे करता येईल हे सांगण्याचा प्रयत्न करतो" असे आपण म्हणता. हे आपण नेमके का करता याबद्दल आपण कोणतेही कारण नमूद केलेले नाही. कदाचित यातून आपल्याला आनंद मिळत असू शकेल (म्हणजेच आनंद मिळवण्याकरिता आपण असे करत असू शकाल). किंवा, उलटपक्षी, कदाचित आपण तसेही आनंदी असाल आणि अत्यंत निर्हेतुकपणे हे काम करत असाल. आपले कारण यांपैकी काहीही असू शकेल. आपण ते स्पष्टपणे मांडलेले नाही, तसे ते मांडण्याची आवश्यकता नाही आणि त्यात मला स्वारस्यही नाही. खरे तर आपण ते मांडूही नये. मात्र, असे कारण आपण स्पष्टपणे मांडलेले नसता "आपण हे आपणास आनंद मिळावा म्हणूनच करता" असे मी ठामपणे ठरवून कोणत्या अधिकाराच्या बळावर टाकावे? "या लेखाला प्रतिसाद द्या अथवा त्यातील मुद्द्यांवरून माझ्याशी वितंडवाद घाला" असे आपण कोठेही म्हटलेले नसता "आपण वाचकांस / प्रतिसादलेखकांस कामाला लावले" असे विधान मी कोणत्या आधारावर करावे? "आनंदी असताना निवांतपणे वेळ घालवण्याऐवजी लेखनात प्रचंड ऊर्जा व्यर्थ खर्च करून इतरांना आयुष्य आनंदी कसे करायचे हे का सांगायचे" हा प्रश्न विचारणारा मी कोण? आपली कारणे आपणास (आणि केवळ आपणासच) चांगली ठाऊक, आणि ती आपल्या जागी, आपल्याकरिता योग्यच असावीत. पण मग तोच न्याय, एव्हरेस्ट सर करू पाहणारे काय किंवा चंद्रावर किंवा मंगळावर जाण्याकरिता मोहिमा आखू पाहणारे काय, त्यांनासुद्धा का लागू करू नये? त्यांची कारणे काहीही असतील; ती कारणे जोपर्यंत ते स्वतः होऊन आपल्याला सांगायला येत नाहीत, आणि व्यक्तिशः आपल्याला सल्ला मागत नाहीत, तोपर्यंत त्यांची धडपड, त्यांचे प्रयत्न हे (१. ) न गवसणाऱ्या (elusive अशा अर्थी) आनंदामागे जाण्याकरिता आहेत, (२. ) व्यर्थ आहेत आणि (३. ) हा अपव्यय आहे हे आपण कशावरून आणि का ठरवावे?

तसेही "जीवन आनंदाने कसे जगता येईल" हेच जर सांगण्याचा हा प्रयत्न असेल, तर "जीवन आनंदाने जगण्याचा (पर्यायाने जीवनात आनंदी असण्याचा) मार्ग म्हणजे जीवनात आनंदी असणे" यातून (ते कितीही बरोबर असले तरी) जीवन आनंदाने जगू पाहणाऱ्याने नेमका काय बोध घ्यावा? जो आनंदाकांक्षी आहे म्हणजेच सध्या आनंदी नाही, त्याला "आनंदी अस म्हणजेच आनंदी असशील" हे सांगितल्यावर त्याने नेमके काय करावे? (उलटपक्षी, जो मुळात आनंदी आहे, त्याला हे सांगण्याची गरज काय?)