१) मी जेंव्हा लिहीतो (मग ते लेखन असो की प्रतिसाद) त्यावेळी फक्त तीनच गोष्टी उपस्थित असतात : माझा आनंद, मॉनिटर आणि की बोर्ड! वाचकांना जरी याची कल्पना नसली तरी मला याची संपूर्ण कल्पना असते. माझ्या लेखनाची कल्पना तुम्हाला बहुदा, तुमची रविवारी सकाळी जी चित्तदशा असते त्यावरून येऊ शकेल. कोणतेही व्यवधान नाही, भविष्यकाळाची चिंता नाही, निव्वळ मुक्तता आणि तुम्ही नकळतपणे गाऊ लागता, तसे माझे लेखन आहे.
तुमच्या गाण्याने तुम्हाला कुणाला त्रास द्यायचा ही कल्पना ही तुमच्या गावी नसते, आनंदाची अभिव्यक्ती म्हणून तुम्ही गात असता. आता तुमच्या गाण्यावर तीन प्रकारे प्रतिसाद येऊ शकतातः
अ) जो तुमच्या चित्तदशेत असतो किंवा तुमचे गाणे एकून त्या स्थितीत येतो तो म्हणतो : क्या बात है! तुम्ही त्याला धन्यवाद देता पण तुम्ही काही त्याच्या धन्यवादासाठी गात नसता. धन्यवाद अशासाठी असतो की चला दोघं मिळून वातावरणाचा रंग बदलू.
ब) कुणी तरी तुमच्या रंगात सामील होण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो : ही गाण्यातली जागा परत घ्याल का? तुम्ही म्हणता ठीक आहे, हे असं आहे. किंवा तो ही तयारीचा असेल तर म्हणतो की ही जागा अशी देखील घेता येईल, तुम्ही आणखी आनंदी होता कारण तुम्हालाही अभिव्यक्तिचा एक नवा पैलू कळलेला असतो.
क) काही जणांना तुमच्या मजेत सामील व्हायचं नसतं, त्यांना त्यांचेच व्याप आणि ताप असतात ते तुम्हाला गाणं बंद करा, तुम्हाला गाणं येत नाही, अमक्याच ऐका, तमक्याचं ऐका असं सांगू लागतात.
आता या सगळ्या प्रतिक्रिया ऐकणाऱ्याच्या चित्तदशेवर अवलंबून असतात, गाणाऱ्याला कुणालाही दुखवायचे नसते, तो गातोय याचाच अर्थ तो आनंदात आहे!
२) माझ्या लेखनावर अशा तिन्ही प्रकारचे प्रतिसाद आहेत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो (जे की मी पहिल्या लेखातच म्हंटलय) की माझा आनंद लेखनात आहे, तुमच्या प्रतिसादावर तो अवलंबून नाही. तुम्हाला कल्पना नसेल की आयुष्यही सगळ्यात मोलाची गोष्ट आहे, माझंही आणि तुमचंही, त्यामुळे :
अ) तुम्हाला आवडलं तर वाचा नाहीतर सोडून द्या, तुमचं आयुष्य वाया घालवू नका. तुम्ही भक्तीमार्गानी जा, नामस्मरण करा, परिक्रमा करा, वेगवेगळे गुरू करा, अध्यात्मिक अनुभव घ्या; मी तुम्हाला बघितले देखील नाही तर मी तुमच्या आड कसा येऊ शकतो? तुम्हाला माझं पटावं असा माझा आग्रह कसा असेल? तुम्ही दुखावले जाण्यासाठी मी लेखन कसे करीन?
ब) दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी मांडणी अत्यंत प्रगल्भ आणि अनुभवसिद्ध आहे. मी जे सांगतो ते मी जगतो. त्यामुळे माझ्यावर चर्चा, माझ्या लेखावर लेख, त्या लेखावर पुन्हा उलट-सुलट प्रतिसाद, माझ्या लेखनातून तुमच्या गुरूंची भलावण असे काही करू नका. तुम्ही चुकीच्या मार्गानी चालला आहात पण तुम्हाला माझी ग्वाही हवी, ते शक्य नाही! मी भक्तीमार्ग, अध्यात्मिक अनुभव, लांब पल्याच्या साधना किंवा कर्मयोगाची भलावण करू शकत नाही. त्याचप्रमाणे मला समजलं नाही म्हणून तुमचं बरोबर असं होणार नाही; मला पूर्ण समजलं आहे आणि ज्या धाडसानं मी ही लेखमाला लिहीली आहे ते ती गोष्ट सिद्ध करण्यास पुरेसं आहे! तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमची लेखमाला सुरू करा!
३) निराकार हा माझा छंद आहे आणि निराकाराशी एकरूपता हा माझा आनंद आहे; मी जी उदाहरणं देतो त्यांचा उद्देश तुम्हाला माहिती पुरवणं हा नसतो तर (तुम्हाला आवड असेल आणि पटत असेल तर) निराकाराशी एकरूपता साधणं हा असतो. निराकार एक असल्यामुळे माझी इथे एकरूपता साधली की तुमचीही (तुम्ही जगभरात कुठेही असाल तरी) ती साधली जाते. ते आगदी गाण्यासारखं आहे इकडे गायक समेवर आला की तिकडे ऐकणारा समेवर येतो! त्यामुळे उगाच डिटेल्सवर चर्चा करण्यात आता मी वेळ घालवणार नाही. तुम्हाला कळलं नसेल आणि कळावसं वाटत असेल तर तुम्ही लेखमाला पहिल्यापासून वाचा, मी इतकं विस्तारानी आणि सोपं लिहीलं आहे की तुम्हाला सगळं समजेल.
संजय