१. गालिब यांना भारत या देशाबद्दल काहीही आस्था नव्हतीही अन असण्याचे कारणही नव्हते. (अर्थात, हा काही गुन्हा होऊ शकत नाही, पण इंग्रजांच्या बाजूने लिहिणे हा देशद्रोह मानायला वाव आहे. )
चीन-ओ-अरब हमारा, हिंदोस्ता हमारा
मुस्लिम है हम वतन है सारा जहाँ हमारा
('दुसरे गालिब' समजले जाणारे डॉ. सर महंमद इक्बाल त्यांच्या तराना-ए-मिल्ली मध्ये)
पहिले म्हणजे महंमद इक्बाल यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गालिबला जबाबदार धरणे चुकीचे आहे. स्वतः गालिबच्या लिखाणात स्वतः मुसलमान (आणि म्हणून सर्वश्रेष्ठ) असल्याबद्दलचा किंवा इस्लामचा अभिमान अजिबात आढळत नाही, जो इक्बाल यांच्या लेखनात आढळतो. इक्बाल कट्टर पाकिस्तानवादी होते तर गालिबच्या लेखनाचा टोन धर्मनिरपेक्ष आहे.
दुसरे म्हणजे भारत हा एक देश आहे आणि या देशाबद्दल आपल्याला अभिमान हवा अशी भावना इंग्रज आल्यावर आणि इंग्रजी शिक्षण घेतलेल्या लोकांच्यामध्ये वाढीस लागली. त्या आधी ज्यांना देशभक्त म्हणतो असे लोक झाशीची राणी, नानासाहेब आणि रावसाहेब पेशवे, तात्या टोपे, जगदीशपूरचा महाराणा, अयोध्येची बेगम, बहादूरशहा जफर ही सर्व १८५७ च्या उठावात अग्रेसर असलेली मंडळी फक्त आपली संस्थाने वाचवण्यापुरतीच होती. सबंध भारत देशाबद्दल प्रेम होते की नाही याबद्दल मी साशंक आहे. हे खरे की रावसाहेब आणि तात्या या दोघांनी बंडाची व्याप्ती जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांना देशभक्त म्हणता येईल. मंगल पांडे आणि इतर शिपायांबद्दल सांगायचे तर फौजेत त्यांच्यावर इंग्रज अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते पेटून उठले होते. आपली मातृभूमी परतंत्र आहे आणि आपण तिला यांच्या पाशातून मुक्त करायची आहे अशी भावना त्यांच्यात होती याबद्दल मी साशंक आहे. (सावरकरांचे "१८५७ चे स्वातंत्र्यसमर"वाचूनही माझी हीच भूमिका आहे.)
इंग्रजांच्या बाजूने लिहिणे हा देशद्रोह मानला तर इंग्रजांचे राज्य आल्याने भारतीय लोकांना जगाची ओळख झाली, वैज्ञानिक दृष्टीकोन आला, देशाची प्रगती झाली, धार्मिक कर्मकांडे कमी झाली असे विचार मांडणारे लोक म्हणजे न्यायमूर्ती रानडे, आगरकर, लोकहितवादी, इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणणारे प्रखर राष्ट्रवादी विष्णुशास्त्री चिपळूणकर, इतकेच काय इतर कुठल्या लोकांपेक्षा इंग्रजांचे राक्य आले हे त्यातल्या त्यात बरे झाले असे लिहिणारे लोकमान्य टिळकही देशद्रोहीच मानावे लागतील.
गालिबने रद्द झालेले पेन्शन सुरू व्हावे यासाठी इंग्रजांना अर्जविनंत्या केल्या यात मला गैर वाटत नाही. नानासाहेब पेशवा बंडाच्या आधी वेगळे काय करत होता? झाशीची राणी तिचा दत्तक मंजूर करा अशा विनवण्या इंग्रजांना करत नव्हती काय?
ज्या मीर तकी मीरचे आपण गोडवे गाता त्या मीरनेही इंग्रजांकडे ट्रान्सलेटर म्हणून नोकरीसाठी अर्ज केला होता. लगेच त्यालाही देशद्रोही ठरवायचे काय?
गालिबवर थोडेफार तथ्य असलेली टीका म्हणजे १८५७ च्या झंझावाताचा साक्षीदार असूनही त्याचे प्रतिबिंब त्याच्या शायरीत कुठेही दिसत नाही.
बाकी जुगारी, व्यसनी, कर्जबाजारी असणे हे दोष असतील. पण शेवटी तो एक श्रेष्ठ कवी होता हे लक्षात घेतले तर या दोषांकडे दुर्लक्ष करणेच योग्य नाही का?
विनायक