गालिबचे किंवा गालिबबद्दल फारसे काही वाचलेले नसल्यामुळे, मीर तकी मीरबद्दल 'या नावाचा एक उर्दू कवी होऊन गेला' याहून अधिक काही कल्पना नसल्यामुळे, आणि श्री. मुहम्मद इक्बाल यांच्याबद्दल बहुतांशी केवळ ऐकीव किंवा अगदी वरवरची (विकीपातळीची) वाचीव माहिती असल्यामुळे, (लेखातील किंवा) प्रतिसादातील तथ्याच्या मुद्द्यांवर बोलण्यास असमर्थ आहे, केवळ तर्कावर भाष्य करू इच्छीतो. काही फुटकळ मुद्द्यांबाबत दृष्टिकोनाचा किंचित फरक वगळल्यास प्रतिसादातला
युक्तिवाद बहुतांशी पटण्यासारखा वाटला. जेथे काही फरक वाटला तेवढेच मुद्दे येथे नमूद करू इच्छितो. (यातील बराचसा भाग प्रस्तुत लेखाच्या संदर्भात अवांतर असू शकेल. )
पहिले म्हणजे महंमद इक्बाल यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गालिबला जबाबदार
धरणे चुकीचे आहे. स्वतः गालिबच्या लिखाणात स्वतः मुसलमान (आणि म्हणून
सर्वश्रेष्ठ) असल्याबद्दलचा किंवा इस्लामचा अभिमान अजिबात आढळत नाही, जो
इक्बाल यांच्या लेखनात आढळतो.
इक्बाल यांच्या कृत्याबद्दल गालिबला दोषी (किंवा जबाबदार) धरू नये हे मान्यच. मात्र इक्बाल यांचे ते कृत्य हा त्यांचा "गुन्हा" म्हणावा किंवा कसे याबद्दल साशंक आहे. स्वतःच्या संप्रदायाबद्दलचा दुरभिमान (विशेषत: गतवैभव, गतकालीन 'अचीव्हमेंट्स' [मराठी? ], जागतिक व्याप्ती वगैरेंच्या आधारावर), घमेंड वगैरे हे दुर्गुण तर खरेच, पण "गुन्हे" म्हणता येतील असे वाटत नाही. हा मानवी स्वभावाचा भाग आहे, आणि कमीअधिक फरकाने कोणताही संप्रदाय (धर्म, जात, जमात, प्रांत, भाषिक गट, शहर, देश किंवा राष्ट्रीयत्व, वर्ण, वंश, बुद्धिमत्तेची पातळी [स्वघोषित, बुद्ध्यंकावर आधारित किंवा इतर कोणत्याही निकषावर आधारलेली], शैक्षणिक पातळी, शैक्षणिक विभाग किंवा मुख्यविषय, गल्ली, उपनगर, शाळा किंवा कॉलेज, एकाच शाळेच्या एकाच इयत्तेच्या वर्गांच्या दोन तुकड्या, क्रीडासंघ, लष्करी-विरुद्ध-गैरलष्करी ['सिव्हिलियन'] दर्जा, आहारनिर्बंधांवर किंवा आहाराच्या आवडीनिवडींवर आधारित कोणतीही विभागणी, अगदी पाणी-विरुद्ध-कागदसुद्धा, यांपैकी किंवा यांव्यतिरिक्तही कोणत्याही निकषांवर आधारित अर्थाने) याला अपवाद नसावा. (दुरभिमान किंवा घमेंडच बाळगायची तर काय, कशाचीही बाळगता येते! )
तराना-ए-मिल्ली ('चीन-ओ-अरब हमारा')चा अर्थ नेमका कसा लावावा हे मला माहीत नाही, पण '(प्रदेशाधारित किंवा राज्याधारित) राष्ट्रीयत्वापलिकडे जाणाऱ्या परस्परबंधुभावी जागतिक मुसलमानी संप्रदायाचे गौरवगान' (शब्दांकन त्यात त्रुटी असल्यास त्यातील त्रुटींसह माझे) असा जो एक त्याचा अर्थ सांगितला जातो, तो ग्राह्य धरल्यास, त्यावर इक्बाल यांच्या या संकल्पनेत तथ्य आहे किंवा नाही या मुद्द्यावरून आक्षेप कदाचित घेता येईलही, परंतु त्यात "गुन्हा" म्हणण्यासारखे काही वाटत नाही.
त्यामुळे यातील "गुन्हा" या शब्दाच्या वापराबद्दलचा मतभेद वगळल्यास बाकीचा तर्क पटण्यासारखा आहे.
इक्बाल कट्टर पाकिस्तानवादी होते तर गालिबच्या लेखनाचा टोन धर्मनिरपेक्ष
आहे.
यातील 'इक्बाल कट्टर पाकिस्तानवादी होते' या भागाबद्दल (विधान तत्त्वतः मान्य असले तरी) अधिक माहिती (प्रस्तुत लेखाकरिता पूर्णपणे अवांतर असल्यामुळे कदाचित स्वतंत्र लेखाद्वारे) कोणी मांडू शकल्यास रोचक ठरावी.
'पाकिस्तान' या संकल्पनेची व्याख्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आली आहे (किंवा 'पाकिस्तान' या संज्ञेतून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे अर्थ अभिप्रेत होते) अशी माझी (अर्थात वरवरच्या वाचनावर आधारलेली) समजूत आहे. 'ब्रिटिश हिंदुस्थानातील मुस्लिमबहुल प्रदेशांचे ब्रिटिश साम्राज्यांतर्गत किंवा ब्रिटिश साम्राज्याबाहेर स्वायत्त राज्य', 'ब्रि. हिं. मुस्लिमबहुल प्रदेशांचे हिंदुस्थानी संघराज्यांतर्गत स्वायत्त राज्य', 'हिंदू आणि मुसलमान हे दोन्ही ब्रि. हिं. या एकाच प्रदेशाचे रहिवासी असले तरी त्यांचे राष्ट्रीय हितसंबंध वेगवेगळे आहेत, एकाच राज्यातील ही दोन भिन्न राष्ट्रे आहेत या संकल्पनेवर आधारित ब्रि. हिं. मधील मुस्लिम समाजाबद्दलची संकल्पना', 'ब्रि. हिं. मधील मुसलमानांकरिता ब्रि. हिं. मधील मुस्लिमबहुल प्रदेश ही भौगोलिक व्याप्ती असलेले पूर्णपणे स्वतंत्र राष्ट्र' अशा प्रकारच्या विभिन्न व्याख्या माझ्या समजुतीप्रमाणे वेगवेगळ्या वेळी या शब्दाशी निगडित होत्या. श्री. इक्बाल यांची 'पाकिस्तान'ची व्याख्या नेमकी काय होती हे मला नीटसे कळलेले नाही. या निमित्ताने याबाबत कोणी स्पष्टीकरण देऊ शकल्यास आवडेल.
तसेही पुढच्या परिच्छेदात आपणच काहीसे म्हटल्याप्रमाणे भारत (किंवा खरे तर हिंदुस्थान, अर्थात ब्रि. हिं. हे राज्य) हा एक देश (किंवा खरे तर एक राष्ट्र) आहे ही संकल्पना ब्रिटिश या भूमीत पाऊल ठेवण्याआधी नसल्याकारणाने, जेव्हा इंग्रजी शिक्षणामुळे म्हणा किंवा इंग्रज राज्यकर्ते हे केवळ शोषकच नव्हे, तर 'बाहेरचे' आहेत, 'आपल्या'पेक्षा वेगळे आहेत, 'आपण' 'त्यां'च्यापेक्षा वेगळे आहोत, या जाणिवेतून म्हणा, जेव्हा 'राष्ट्र' ही संकल्पना या प्रदेशातील लोकांत रुजू लागली, तेव्हा मुळापासून असलेल्या 'ब्रि. हिं. मधील सर्व जनता हे एक राष्ट्र' या भावनेअभावी येथील वेगवेगळ्या गटांस (किंवा काही गटांस) 'आपला गट हे ब्रि. हिं. च्या भौगोलिक प्रदेशात वसणारे एक राष्ट्र आहे' अशी तीव्र भावना (इतर गटांबद्दल द्वेष न बाळगूनसुद्धा केवळ सांस्कृतिक भिन्नतेच्या आधारावर 'आपण या भौगोलिक प्रदेशातील इतर गटांपेक्षा वेगळे आहोत, आपला वेगळा आणि एक वैशिष्ट्यपूर्ण, इतरांहून भिन्न पण आपल्या अंतर्गत समान हितसंबंध असलेला असा गट आहे' ही तीव्र भावना) आल्यास ते नैसर्गिक मानता यावे. अशा परिस्थितीत, सुरुवातीच्या काळात 'एक राष्ट्र' ही संकल्पना नसताना किंवा असल्यास नवजात असून, नुकतीच रुजू लागलेली असून पुरेशी प्रस्थापित झालेली नसताना 'कट्टर पाकिस्तानवाद' हा "गुन्हा" ठरू नये, फार तर "एक वेगळा विचार" ठरावा. (आजच्या परिस्थितीत 'भारतीय संघराज्य हे एक राष्ट्र' ही संकल्पना प्रस्थापित झालेली असताना हे विधान लागू होऊ नये. )
दुसरे म्हणजे भारत हा एक देश आहे आणि या देशाबद्दल आपल्याला अभिमान हवा अशी
भावना इंग्रज आल्यावर आणि इंग्रजी शिक्षण घेतलेल्या लोकांच्यामध्ये वाढीस
लागली. ... हे खरे की रावसाहेब आणि तात्या या दोघांनी बंडाची
व्याप्ती जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांना देशभक्त म्हणता
येईल. ... (सावरकरांचे "१८५७ चे
स्वातंत्र्यसमर"वाचूनही माझी हीच भूमिका आहे.)
पहिल्या अधोरेखिताबद्दल: यातही देशभक्तीचा भाग कितपत असावा आणि सोयिस्कर धोरण ('प्रॅक्टिकल पॉलिसी' अशा अर्थी) अधिक दूरदृष्टीचा भाग कितपत असावा याबद्दल मी साशंक आहे.
दुसऱ्या अधोरेखिताबद्दल अवांतर: सावरकरांचे "१८५७चे स्वातंत्र्यसमर" मी वाचलेले नाही, त्यामुळे त्यातील तपशिलांशी मी परिचित नाही. त्यामुळे या वाक्याचे महत्त्व ('सिग्निफिकन्स' अशा अर्थी ), त्यातून नेमके काय सांगायचे आहे हे मला कळू शकले नाही. दोष अर्थात सर्वस्वी माझा.
परिच्छेदातील उर्वरित मजकुरामागील युक्तिवाद पटण्यासारखा वाटला.
गालिबवर थोडेफार तथ्य असलेली टीका म्हणजे १८५७ च्या झंझावाताचा साक्षीदार
असूनही त्याचे प्रतिबिंब त्याच्या शायरीत कुठेही दिसत नाही.
यात तथ्य असेलही, परंतु त्यातही टीका करण्यासारखे काही जाणवले नाही. गालिब हा कवी होता, इतिहासकार नव्हे. त्यामुळे तसे प्रतिबिंब त्याच्या शायरीत असलेच पाहिजे असे बंधन किंवा जबाबदारी त्याच्यावर नसावी. त्यामुळेच कशाबद्दल काव्य करावे आणि कशाबद्दल करू नये हा सर्वस्वी त्याच्या वैयक्तिक अखत्यारीतला प्रश्न असावा, असे वाटते. (अर्थात, हा आक्षेप आपण घेतलेला नाही, हे मान्य.)
बाकी जुगारी, व्यसनी, कर्जबाजारी असणे हे दोष असतील. पण शेवटी तो एक
श्रेष्ठ कवी होता हे लक्षात घेतले तर या दोषांकडे दुर्लक्ष करणेच योग्य
नाही का?
हे पटण्यासारखे आहे. या वैयक्यिक बाबी झाल्या. याची नोंद करण्यात काही गैर नसावे, परंतु कवी म्हणून त्याचे मूल्यमापन करताना या बाबींनी काही फरक पडू नये.
तूर्तास एवढेच.