होम्सच्या सर्वच कथा मला आवडतात आणि काही कथा जास्त आवडतात. ह्या गोष्टीचा समावेश मी 'जास्त' आवडलेल्या कथांमध्ये करत नाही पण तरीही यातसुद्धा होम्सचे चातुर्य दिसून येतेच.
मेरी होज्मरचे जे वर्णन करते; म्हणजे त्याचा चारचौघांपेक्षा जरा वेगळा आवाज, शक्यतो अंधार पडल्यावरच भेटण्याचा आग्रह, पत्रं स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिण्याऐवजी टंकित करून पाठवणं हे सर्वच होम्सला संशयास्पद वाटतं. शिवाय होज्मर आणि विंडीबँक हे दोघे कधीच एकत्र असत नाहीत. या सर्वावरून होम्स असा तर्क करतो की विंडीबँकच होज्मर होऊन मेरीला भेटत असेल. आपला हा तर्क तपासून पहाण्यासाठी तो अतिशय खुबीने विंडीबँक यांच्याकडून एक टंकलिखित पत्र मिळवतो. होज्मरची पत्रे आणि ते पत्र एकाच टंकयंत्रावर टंकित झाली आहेत याची खात्री करून घेतो आणि विंडीबँक यांनी मेरीला फसवलं आहे हे माप त्यांच्या पुरतं गळ्यात घालतो.
गुन्ह्याचा नुसता शोधच घेतला पाहिजे असं नाही तर गुन्हेगाराला शिक्षाही झाली पाहिजे असे होम्सचे विचार असतात. म्हणूनच विंडीबँक जेव्हा म्हणतात की कायदा मला काही करू शकणार नाही. तेव्हा होम्स विंडीबँकना म्हणतो की "कायदा तुम्हाला काही करू शकणार नाही हे खरं पण मेरीला एखादा भाऊ असता तर तुमची धडगत नव्हती. त्याने तुम्हाला चांगला धडा शिकवला असता!" पुढे तो वॉटसनला म्हणतो की हा माणूस असाच वागत राहील आणि एखाद्या दिवशी असा काही गुन्हा करेल की त्याला फासावर सुद्धा चढवतील."