हा तुकारामांच्या एका अभंगातील अंश आहे. तो अभंग असा :

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥३॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥४॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥५।।

सखोल आध्यात्मिक अर्थ काही मला सांगता येणार नाही पण वरकरणी तुकोबा असे म्हणताहेत की जो माणूस लहान राहतो तो साखरेचे बारीक कण (रवा) खाणाऱ्या मुंगीप्रमाणे सुखी असतो. जसजसा तो मोठा होत जातो तशा त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढत जातात, त्याला आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या यातना वाढत जातात. ह्या त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी ऐरावताचे व मोठ्या झाडांचे उदाहरण दिलेले आहे.