बेफिकीर

माझा लेखही या लेखकाला उतर समजावे. फक्त "तुम्ही ज्या मीर तकी मीरचे.... " ऐवजी "लेखक ज्या मीर तकी मीरचे... " असे वाचावे.

मंकू २००९

आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे हे सविस्तर लिहिलेत तर उत्तर देता येईल.

श्री. टग्या

इक्बाल यांचे राजकीय विचार इथे वाचता येतील. अर्थात मला इतकी सविस्तर माहिती नव्हती. आधी महंमद अली जीना यांच्याबद्दल वाचत असताना चरित्रकारांनी जीना हे सेक्युलर वृत्तीचे असून त्यांनी आधी पाकिस्तानची कल्पना हसण्यावारी नेली होती, पण इक्बाल यांनी जीनांचे मन वळवल्याने ते पाकिस्तानवादी झाले असे वाचले होते. पाकिस्तानवादी असणे हा फार तर वेगळा विचार असू शकेल, पण गुन्हा नाही हे आपले मत योग्यच आहे.

माझ्या हातून गुन्हा शब्द लिहिला गेला याचे एक कारण देऊ शकेन. कुठलाही विचार हा सैद्धांतिक पातळीवर वर्ज्य नसतो, पण काही विचारांची अंमलबजावणी ज्या प्रकारे होते तो गुन्हा असतो. उदा. कार्ल मार्क्सच्या विचारांबद्दल मला आदर आहे, पण ज्या पद्धतीने स्टॅलिनने त्यांची अंमलबजावणी केली आणि लाखो/कोटीच्या घरात निरपराध लोकांची कत्तल केली तो नक्कीच गुन्हा होता. तीच गोष्ट पाकिस्तानवादाची. दोन भावांचे पटत नसेल तर शांततेने वाटण्या करून वेगळे होतात तसे करता आले असते. पण १० लाख निरपराधी लोकांचे (हिंदू आणि मुसलमान मिळून) हत्त्याकांड, १ कोटी लोक विस्थापित, हजारो स्त्रियांवर अत्त्याचार इतका विध्वंस एका विचाराच्या अंमलबजावणी करणे हा गुन्हाच आहे. अर्थात इक्बाल यांचे निधन १९३८ मध्येच झाले, त्यांनी हयात असताना निरपराध लोकांची हत्त्या करूनही पाकिस्तान मिळवावे असे लिहिलेले वाचले नाही त्यामुळे त्यांचे कृत्य असेच लिहायला हवे होते हे तुमचे मत बरोबर आहे.

थोडेसे १८५७ बद्दल. या विषयावर सावरकरांचे "१८५७चे स्वातंत्र्यसमर" आणि न. र. फाटकांचे "शिपायांचे बंड" अशी दोन परस्परविरोधी दृष्टीकोन व्यक्त करणारी पुस्तके वाचली. दोन्ही पुस्तकातून सारख्याच घटना मांडल्या आहेत सावरकरांची सहानुभूती क्रांतीकारकांना तर न. र. फाटकांना क्रांतीकारकांबद्दल कमालीचा तिरस्कार.

१९०७ चा काळ (१८५७ ला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने), सावरकर स्वतः क्रांतीकारक आणि क्रांतीची प्रेरणा इतरांना मिळावी या हेतूने सावरकरांनी हे पुस्तक मुद्दाम लिहिलेले असल्याने ते एकांगी असणार यात आश्चर्य नाही. इंग्रजांच्या विरुद्ध लढणारे ते देशभक्त आणि इंग्रजांच्या बाजूने असणारे ते देशद्रोही अशी सोपी मांडणी सावरकरांनी केली आहे. त्यामुळे नानासाहेब- रावसाहेब पेशवे, झाशीची राणी, जगदीशपूरचा महाराणा, अयोध्येची बेगम, बहादूरशहा ही मंडळी देशभक्त आणि ग्वालेरचे दौलतराव शिंदे, पोवेनचा संस्थानिक ही मंडळी देशद्रोही. शीख, गुरख्यांबद्दल सावरकरांना आदर असल्याने त्यांना देशद्रोही म्हटले नाही, फक्त सौम्य नाराजी व्यक्त केली आहे.

पण आज विचार करताना बंडात सामील होणे - न होणे हे प्रत्येकाने आपल्या संस्थानाचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून केले होते. इंग्रजांनी वारसा हक्क मान्य केले असते, पेन्शने सुरू ठेवली असती तर वरच्यापैकी किती लोक बंडात आले असते याबद्दल शंका आहे.

बंडाचा इतिहास इंग्रजांनी सांगोपांग लिहून ठेवलेला असल्याने न. र. फाटकांचे काम फक्त त्यांचे भाषांतर करणे इतकेच असले तरी त्यांनी क्रांतीकारकांबद्दल वापरलेली भाषा तितकी चांगली नाही. उदा. इंग्रजांनी बंडवाल्यांचे टाळके सडकून काढले, त्यांना चांगलाच चोप दिला वगैरे.

रावसाहेब आणि तात्या टोपे यांच्याबद्दल आपण मांडलेल्या मताशी सहमत आहे.

यानिमित्ताने असे लक्षात आले की इंग्रजांविरूद्ध लढणाऱ्या कोणालाही आपण स्वातंत्र्ययोद्धा समजतो. दोन प्रसिद्ध उदाहरणे म्हणजे नबाब सिराजुद्दौला आणि टिपू सुलतान. इतिहासकार शेजवलकरांनी नानासाहेब पेशव्याच्या दोन महत्त्वाच्या चुका अशा सांगितल्या आहेत. एक म्हणजे प्लासीची लढाई झाली (इ. स. १७५७) त्यावेळी पेशव्याने अलिवर्दीखानाबरोबर (सिराजुद्दौल्याच्या आजोबा) केलेला मैत्रीचा करार लागू होता तरीही पेशव्याने मदत केली नाही आणि अप्रत्यक्षपणे रॉबर्ट क्लाईव्हला मदत केली. दुसरे उदाहरण म्हणजे रॉबर्ट क्लाईव्हची मदत घेऊन आंग्र्यांचे आरमार बुडवले.  सिराजुद्दौल्याच्या जुलुमी,अन्यायी, धर्मांध राजवटीला हिंदू प्रजा कंटाळली होती म्हणूनच क्लाईव्हला त्याविरुद्ध इतकी मदत मिळाली. एक तर पेशव्याने सिराजुद्दौल्याला पदचुत करून स्वतः राज्य घ्यायचे किंवा क्लाईव्ह सिराजुद्दौल्याचा पाडाव करत असताना दुर्लक्ष करून तो आपोआप होऊ द्यायचा हेच माझ्या मते शहाणपणाचे पर्याय होते. पेशव्याने पहिला पर्याय अवलंबला असता तर मला जास्त आवडले असते. पण सिराजुद्दौल्याला मदत केली नाही याबद्दल किंचितही वाईट वाटत नाही.

नरहर कुरूंदकरांच्या विचारांबद्दल मला आदर आहे. तरीही काही वेळा त्यांचे विचार पटत नाहीत. पुण्यात १९८१ मध्ये केलेल्या भाषणात नाना फडणीसाच्या चुका सांगत होते. तेव्हा ते म्हणाले की टिपू सुलतानाने नाना फडणीसाकडे प्रस्ताव आणला होता की पेशवे, टिपू आणि निजाम मिळून इंग्रजाचा पाडाव करू. नाना अदूरदर्शी म्हणून त्याने हा प्रस्ताव नुसताच अमान्य केला नाहीतर टिपूकडे तीन हमीदार मागितले आणि त्यात एक इंग्रज होते. नानाने टिपू - निजामाबरोबर हातमिळवणी केली असती तर हिंदुस्तानना इतिहास वेगळा झाला असता. त्यावेळी हे विधान पटले तरी नंतर जेव्हा टिपू सुलतानाचे चरित्र वाचले तेव्हा नानाच काय डोके ठिकाणावर असलेल्या कुठल्याही मनुष्याने टिपूवर विश्वास ठेवला नसता याबद्दल खात्री पटली.  टिपू सुलतान हाही धर्मांध, जुलुमी आणि विश्वासघातकी म्हणून प्रसिद्ध होता. कूर्गी नायर लोकांची हजारो - लाखोंच्या संख्येने सक्तीने धर्मांतरे घडवली. बाजूच्या मुसलमान राजाला भेटीला बोलावून विश्वासघाताने मारले. मुसलमान असलेला हैदराबादचा निजामसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हता तर नानाने त्याच्यावर विश्वास ठेवून इंग्रजांशी लढावे ही अपेक्षा करणे चुकीचे आहे.

थोडक्यात, कुठल्याही प्रकारचा अभिनिवेष बाजूला ठेवून इतिहासाकडे बघितले पाहिजे.  

विनायक