माझ्या दोन आठवणी प्रकर्षानें जाग्या झाल्या.

१. साल बहुधा १९७०-७१. दादर मुंबईच्या छबिलदासमधला पं. गामेखां पुण्यतिथी समारोह. आम्हीं उण्यापुऱ्या १९-२० वर्षांचे. भीमसेन, रविशंकर, अल्लारखां, बिस्मिल्ला खां, अली अकबर खां, रामनारायण, व्ही जी जोग, सामता प्रसाद आणि मुरली महाराज हे वगळतां आम्हीं म्हणजे मी आणि माझे एकदोन मित्र फारसे कोणाला ओळखत नव्हतों. रात्रीं ८ वाजतां कार्यक्रम सुरूं झाला.
एकदोन तासांनीं एका बारीकशा वृद्ध गृहस्थांस कोणीतरी दोघांनीं मंचावर आणून बसवलें. वृद्धापकाळामुळें त्यांना धड चालतांही येत नव्हतें. त्या गृहस्थांनीं जें तबलावादन केलें तें आजतागायत विसरलेलों नाहीं. त्या काष्ठवत हातांत अशी वीज संचारून गेली कीं ज्याचें नांव तें. एका गृहस्थांस आम्हीं विचारलें कीं हे कोण म्हणून. एखाद्या झुरळाकडे पाहावें तसें त्यानें आमच्याकडे पाहिलें व म्हणाले कीं ते आहेत थिरखवां खानसाहेब. ज्यांचें केवळ बालगंधर्वांना जोडून घेतले जाणारें नांव आम्हांला ठाऊक होतें.

२. त्याच्यानंतर एकदोन वर्षांची गोष्ट. स्थळ आतां नीट आठवत नाहीं पण बहुधा छबिलदासच. पं. पलुस्कर पुण्यतिथी समारोह. पहिल्या दिवशीं सर्वांत शेवटीं, उत्तररात्रीं वा पहाटे चारसाडेचारला वसंतराव देशपांडे गायला बसले. त्यांचा घसा बसला होता आणि तार सप्तकांत गातांना गळ्याला त्रास होत होता. त्यामुळें नटभैरव मंद्र सप्तकांतच जास्त गायले. खर्जांतलें इतकें अप्रतिम गायन अजून ऐकलें नाहीं.

वय प्रकृती इ. अडचणींतही असामान्य व्यक्ती आव्हानें अशा असामान्य रीतीनें पेलतात हें खरेंच.

असो. अशा आठवणी जाग्या करणारा सुंदर लेख दिल्याबद्दल धन्यवाद.

सुधीर कांदळकर