बरोबर आहे.

मिलिंदजींनी वर दिलेला अर्थ बरोबर आहे.त्यांनी आध्यात्मिक अर्थाविषयी जे लिहिले आहे त्या विषयी मी कट्ट्यावर विषय काढला होता. डॉ. रामपूरकर हे कीर्तनकार, प्रवचनकार असून त्यांनी श्रीज्ञानेश्वरांच्या हरिपाठावर सुदीर्घ विवरण सांगितले आहे. (ग्रंथाचे नांव : नाम-नवनीत, तीन भागात, प्रकाशक : ज्येष्ठ-राज (जोशीकट्टा), सिनियर सिटीझन्स कल्चरल ग्रुप, मांडा (पूर्व), टिटवाळा, जि. ठाणे, पृष्ठे ११००, किंमत रु.३००) श्री. रामपूरकर यांना या अभंगाविषयी विचारले. त्यांनी आनंदाने जे सांगितले ते असे : मूळ अभंग चार चरणीच आहे. ’महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे राहती ॥ हा चरण दुसऱ्या अभंगातील आहे. तो अभंग असा आहे

नीचपण बरें देवा । न चले कोणाचाही दावा ॥१॥
महापुरे झाडें जाती । तेथें लव्हाळे राहती॥२॥
येतां सिंधूच्या लहरी । नम्र होता जाती वरी ॥३॥
तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥४॥’

लहानपण दे गा देवा’ हा अभंग ’देवाला मागणे’ असून ’ नीचपण बरें देवा’ हा अभंग ’देवाशी सलगीचे भाषण’ आहे. म्हणजेच या दोन्ही अभंगांपाठची भूमिका वेगवेगळी आहे.

श्रीतुकाराम महाराजांच्या चरित्रातील एक प्रसंग डॉक्टरांनी सांगितला. श्रीपाद संन्यासीने एकदा रामेश्वरशास्त्रींकडे तक्रार केली. रामेश्वरशास्त्री यांचेकडे देहू पंचक्रोषीसाठी धर्मदंड होता. श्रीपाद संन्यासीने जी तक्रार केली होती त्यानुसार तुकाराम हे वाणी असल्याने त्यांना वेदांचा अधिकार नसूनही ते वेदांचा अर्थ सांगत फिरत असतात. त्यामुळे तुकारामांना शिक्षा व्हावयास हवी, अशी त्या संन्याशाची मागणी होती. ही मागणी दादोजी कोंडदेव यांच्यापर्यंत गेली. त्यांनाच निवाडा करण्यासाठी सांगितले गेले. दादोजी कोंडदेव फार न्यायनिष्ठुर होते. एकदा त्यांनी जेवताना डाव्या हाताने स्वतः मीठ वाढून घेतले. त्यावर त्यांच्या पत्नीने कांहीशा थट्टेने ’मीठ वाढणे हे माझ्या अधिकारातील असताना तुम्ही कसा हात लावलात, असा प्रश्न त्यांना विचारला. पत्नीचे म्हणणे दादोजींने मान्य केले व डावा हात कलम करून घेण्याचे ठरविले. पत्नीने त्यांची समजूत घातली खरे, पण दादोजींनी शिक्षा सोसण्यासाठी अंगरख्याची डावी बाही छाटून घेतली. पुढे त्यांनी एका बाहीचाच अंगरखा वापरला. अशा दादोजींनी तुकारामांना चौकशीला बोलाविले. तुकारामांनी अभंगाद्वारेच त्यांना जे निवेदन करावयाचे ते केले. दरम्यान श्रीपाद संन्याशाला तुकारामांच्या जागी वेगवेगळे भास होऊ लागले. दिव्य प्रकाश दिसावयास लागला. तेव्हा तो संन्याशी तेथून जाऊ लागला. दादोजींनी त्याला थांबविले व तक्रार मागे घ्यावयाची असल्यास तसे करण्याविषयी सांगितले. संन्याशाने तुकारामांच्या चरणावर डोके ठेवले. सर्वच जण तुकाराम महाराजांकडे अत्यादराने पाहू लागले. हे सारे पाहून तुकोबाराय संकोचित झाले. ’माझे जीवन भक्तीमय व निरतिशय आनंदाने भरले आहे. लौकिकात मिळणारा मानसन्मान हे माझ्याकरिता विषमय ठरणारे आहे. ते माझ्या आनंदात मिसळले गेले तर सारा रसभंग होईल’, या मनोभूमिकेतून त्यांनी भगवंताला म्हटले आहे की, ’लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥’ या प्रसंगी तुकारामांनी पुढे भगवंताकडे केलेली मागणी म्हणजे ’लहानपण दे गा देवा ।’ भावार्थ असा की, जे लहान असतात, त्यांचा द्वेष कोण व कशाकरता करणार? उलट, भूतदया म्हणून लोक रवा-साखर मिसळून मुंग्यांना खायला देतात. यातील दुसरा एक बारकावा असा की, लाल प्रामुख्याने रव्याकडे धाव घेत असतात, तर काळ्या मुंग्या साखरेकडे. भूतदयेने विचार करताना माणूस मुंगी ही, चावणारी लाल मुंगी आहे कां देवाची काळी मुंगी आहे, हा विचार न करता रवा-साखर देतो. (रवा म्हणजे शिरा असाही एक अर्थ. साखरेचा शिरा हा श्रीमंती थाट तर गुळाचा शिरा हे गरिबाचे पक्वान्न. मुंग्यांना ते श्रीमंती खाद्य मिळते. ) ’लहानपणा’च्या फायद्यासाठी घेतलेल हा दृष्टांत. पुढील चरणात मोठेपणाच्या तोट्याविषयी सांगण्यासाठी तुकाराम महाराज इंद्राचे वाहन ऐरावताचा दृष्टांत देतात. ऐरावत हा समुद्रमंथनातून निघालेले अमूल्य रत्न. ते देवांच्या राजाचे म्हणजेच इंद्राचे वाहन बनले. पण, त्याला कह्यात ठेवण्यासाठी टोकदार अंकुशाचा उपयोग केला जातो. त्या यातना ऐरावताला सहन कराव्या लागतात. हे दोन दृष्टांत दिल्यानंतर तुकाराम महाराज तत्त्वबोध सांगतात - ’ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥ शेवटच्या चरणातून सामान्यांसाठी बोध देतात- ’तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥’ यातील ’जाण’ हा शब्द महत्वाचा आहे. जे कांही सांगितलंय ते नीट लक्षात घे, असा भाव या शब्दामागे आहे.