पुर्वजन्माचे अनुभव, इंट्युइशन, टेलिपथी वगैरे खरे की खोटे या बद्दल माझे काहीच मत नाही. संशयाचा फायदा दोन्ही बाजुंना देऊन माझ्यापुरता हा विषय मी सोडून दिला आहे.
परंतु या सर्वाचा कार्यकारणभाव जो या लेखात दिला आहे, त्याबद्दल काय बोलावे? ओढून ताणून 'लहरी, ऊर्जा' , किंवा विज्ञान जगतातील तत्सम शब्द वापरून एखादी गोष्ट 'विज्ञान' होत नसते.
मेंदू जर काही प्रक्षेपित करत असेल, तर ते कोणत्या स्वरूपात? ध्वनी लहरी, विद्युतचुंबकीय लहरी, की आणखी कोणत्यातरी, सध्याच्या विज्ञानाच्या कक्षेत बसणाऱ्या लहरी?
मानवाच्या डोक्यातून विचाराचे किरण बाहेर पडतात, हे कोणत्या विज्ञानविषयक परिसंवादात मांडण्यात आले आहे? किंवा कोणत्या जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे? मेंदूत साठवलेली माहिती ही रासायनिक/विद्युत प्रकारची असते, मेंदुतील पेशींच्या विशिष्ठ रचना ही माहिती साठवून ठेवतात (अर्थात मानवाला याविषयी असलेली माहिती अद्याप फारच तोकडी आहे). उपरोल्लेखित लहरी या पेशींच्या रचनांमध्ये हवा तो परिणाम (म्हणजे इकडली माहिती तिकडे साठवणे) कसा काय साधतात?
अशी ढोबळ विधाने करून कोणत्याही गोष्टीचे वैज्ञानिक निरुपण करणे शक्य नसते.