गंगाधरजी, एक सांस्कृतिक सदराचा आपण उपोद्घात केलात्.
डॉ. सरोजिनी बाबर यांनी 'भोंडला-भुलाबाई' या मथळ्याचे सुंदर पुस्तक संपादित केले आहे. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे ते १९७९ साली प्रकाशित केले आहे. मोठं सुंदर संपादन आहे, संग्राह्य आहे. यातील उल्लेखाप्रमाणे भुलाबाई म्हणजे महादेवी व भुलाजी म्हणजे भोलेनाथ शंकर. भुलाबाई माहेरी येते ती भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत... महिनाभर. त्यानिमित्ताने मुली-सुना-सासवा यांच्यासाठी हा मनोरंजनाचा प्रकार  रूढ झालेला व पुढे लोक-रीत म्हणून गणला गेलेला. वरील संग्रहातील एक गीत असे आहे -

सोन्याचं फुलपात्र चांदीचं ताम्हण
तिघं आमचे मामूजी संध्या करीत होते
मामूजी मामूजी मला मूळ आलं
धाडतात का, धाडतात का
मला काय पुसते बरीच दिसते
पूस गं तुझ्या सासूला, सासूला

सोन्याचा पोळपाट चांदीचं लाटणं
तिथं आमच्या सासूबाई पोळ्या लाटीत होत्या
सासूबाई सासूबाई मला मूळ आलं
धाडतात का, धाडतात का
मला काय पुसते बरीच दिसते
पूस गं आपल्या दीराला दीराला

सोन्याची दऊत चांदीचा टाक
तिथं आमचे भाऊजी लिहीत होते
भाऊजी भाऊजी मला मूळ आलं
धाडतात का, धाडतात का
मला काय पुसते बरीच दिसते
पूस गं तुझ्या पतीला, पतीला

सोन्याचा पलंग मखमलीची गादी
तिथं आमचे पतिराज झोपले होते
पतिराज पतिराज मला मूळ आलं
धाडतात का, धाडतात का
हातात काठी लागले पाठी
विसर गं गुलाबाई माहेरच्या गोष्टी ॥