मला नाही वाटत तुमचं काही चुकलंय. जी व्यक्ती आपल्याला ओळखत नाही तिनी आपल्यावर विश्वास टाकावा ही त्या मुलाची अपेक्षा दुराग्रही आणि बालिश वाटते. तो आपल्या ओळखीच्या लोकांकडे काम मिळवण्याचा प्रयत्न करू शकला असता. त्याची प्रतिक्रिया फारशी गंभीरपणे घ्यायचं कारण नाही.
तुम्ही त्याला वीस रुपये देऊन काहीतरी कामधंदा कर असं सांगितलं. त्यामुळे खरोखरच काहीतरी करण्याची जबाबदारी आपल्यावर पडली हे त्याला जाणवलं. पण त्याला काहीच करायचं नव्हतं. आपल्या ऐदीपणाला धोका उत्पन्न झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याची तशी प्रतिक्रिया झाली.
एरिक बर्न या मानसोपचार तज्ज्ञानी आपल्या "गेम्स पीपल प्ले" या पुस्तकात माणसं जे निरनिराळे 'सायकॉलॉजिकल गेम' खेळतात त्यांची माहिती दिली आहे. त्यातल्या माहितीनुसार तो मुलगा "व्हाय डोंच्यू ....... येस बट" हा निष्क्रीय मणसांचा खेळ खेळत होता असं दिसतं. हा खेळ खेळणारे आपल्या निष्क्रीयतेचं खापर परिस्थितीवर फोडतात. त्यांना "व्हाय डोंच्यू .... " म्हणून एखादा पर्याय सुचवला तर ते "येस बट .... " अशी सुरवात करून त्याप्रमाणे करणं कसं शक्य नाही ते सांगतात. दुसरा पर्याय सुचवला तरी तेच. असे एकामागून एक सुचवलेले पर्याय ते हाणून पाडतात. हे करण्यात ही निष्क्रीय माणसं आपली सर्व बुद्धी खर्च करतात. मुळात त्याना निष्क्रीयतेच्या सुखद कोषातून बाहेरच पडायचं नसतं. त्यामुळे ज्यावेळी एखादा पर्याय हाणून पाडणं शक्य होत नाही (उदाहरणार्थ, तुम्ही वीस रुपये देऊन सुचवलेला पर्याय) त्यावेळी त्यांना आपल्या निष्क्रीयतेच्या कोषाला धोका निर्माण झाल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीत निष्क्रीय माणूस प्रामाणिक असेल तर आपल्यालाच काही करायचं नाही याची तो कबुली देतो. पण तो प्रामाणिक नसेल तर त्याची प्रतिक्रिया त्या मुलासारखी असते.