मी जे काही लिहिले ते माझा एक अनुभव म्हणून लिहिले. त्यातून गैरसमज किंवा वाद निर्माण होऊ नयेत एवढीच इच्छा. त्यावेळी झाले हे होते की आमच्याकडे देवाधर्माचे असे काही नव्हते. म्हणजे घराण्याचे गुरुजी वैगेरे नव्हते. त्यामुळे आम्ही आमच्या ओळखीतल्याच गुरुजींना अंत्यसंस्कारासाठी विचारले. (जे वास्तविक माझ्या भावाच्या वर्गातले होते.) त्यांनी त्यावेळी सर्व केले आणि १३ व्या दिवसाची तारीख आणि काय काय लागेल ती सामानाची यादी दिली. १० वे ११ वे वगैरे झाले आणि १३ व्याच्या दिवशी सकाळी ८ वाजता येतो सांगून गेलेल्या गुरुजींचा १० वाजले तरी पत्ताच नाही. आता माझा भाऊ अर्थात सुतकात. तो कोणाच्या घरी जाऊ शकत नाही. आता काय करायचे? एकाने त्यांच्या घरी जाऊन विचारले तर कळले की ते काल रात्रीच गावाला गेले. २/३ दिवस येणार नाहीत. आता मात्र आमचे धाबे दणाणले. आयत्या वेळी काय करायचे? हा कार्यक्रम काही पुढे ढकलता येणारा नव्हता. शेवटी माझ्या बहिणीच्या डोक्यात आले की तिच्या एका मैत्रिणीचे वडील विट्टल मंदिराचे पुजारी आहेत. त्यांना विचारू. ती स्वतः कोणाला तरी घेऊन त्यांच्या घरी गेली. सगळा प्रकार सांगितला. कोणाचे तरी नाव सुचवायला सांगितले. तेव्हा ते म्हणाले की कोणी कशाला, मीच करतो की. (८० साली त्यांचे वय ८० च्या जवळपास होते. ) फक्त मला घेऊन चला आणि आणून सोडा. कारण वयाच्याने मला ते जमत नाही. माझ्या बहिणीने विचारले की पण देवाची पूजाअर्चा करणारे हे काम करत नाहीत असे ऐकले आहे. त्यावर ते म्हणाले "देव पूजेपेक्षा हे काम जास्त पुण्ण्याचे आहे. " त्यांनी येऊन आमची वेळ साजरी केली. नाहीतर आयत्यावेळी आम्ही काय केले असते? म्हणून असे वाटते की या बाबतीत बरेचदा आपल्या भावनांशी खेळ केला जातो. वास्तविक त्या गुरुजींना जर हे काम करायचे नव्हते तर त्यांनी आधीच नाही म्हणायचे होते. आम्ही काय ते तेव्हाच बघितले असते. त्यामुळे माझा तरी विचार असा होतो की आपले आई-वडील जिवंत आहेत तो पर्यंत त्यांची मनापासून सेवा करावी. नंतर ते काही बघायला येत नाहीत की पिंडदान केले की नाही.   या माझ्या लेखनाने जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व!