मी स्वतः बुद्धिप्रामाण्यवादी आहे. खरं तर सुरावातीला मीही देव, धर्म, नशीब, परलोक, इत्यादी गोष्टींवर विश्वास ठेवीत होतो. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसा मी अधिकाधिक नास्तिक होत गेलो आणि आता पूर्णपणे बुद्धिप्रामाण्यवादी झालोय. तरुणपणी नास्तिक असलेली माणसं वय होतं तसतशी आस्तिक होत जातात अशी लोकांची कल्पना असते. माझ्या बाबतीत उलट घडलंय.
असं असूनही माझे आई-वडील वारले तेव्हा मी त्यांचे अंत्यसंस्कार व दिवस वगैरे परंपरागत पद्धतीनी केले. कारण? एक म्हणजे माझ्या आई-वडिलांचा त्यावर विश्वास होता. दुसरं म्हणजे माझ्याइतकंच माझ्या आईवडलांवर प्रेम करणारी आणखी काही माणसं होती. म्हणजे माझे वडील गेले तेव्हा माझी आई जिवंत होती. तिच्यानंतर माझी बहीण व इतर नातेवाईकही होते ज्यांची उपरोक्त गोष्टींवर श्रद्धा होती. जे काही केलं ते मृत झालेल्या व्यक्तींसाठी नव्हतं तर मागे राहिलेल्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जिवंत व्यक्तींच्या समाधानासाठी होतं. या इतर व्यक्ती माझ्याप्रमाणे बुद्धिप्रामाण्यवादी नसल्या तरी माझं त्यांच्यावर नि त्यांचं माझ्यावर प्रेम होतं आणि आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी माझ्या तत्त्वांना तात्पुरती मुरड घालण्यात मी काही चूक केलंय असं मला वाटत नाही. शेवटी प्रेमात सर्व काही क्षम्य असतं नाही का?
माझ्या मते वैज्ञानिक दृष्टिकोण, बुद्धिप्रामाण्यवाद, या गोष्टी अनुभवातून विकसित होणं चांगलं. त्याबाबतीत प्रत्येकाचा वेग वेगवेगळा असू शकतो. सर्वानी आपल्याच वेगानी धावावं हा आग्रह धरणं योग्य नाही.
माझ्या बाबतीत दिवस वगैरे काही करायचे नाहीत असं मी सर्वाना सांगून ठेवलंय.