मूळ लेखात जी उदाहरणे दिली आहेत, त्यांचा व्याकरणाशी काही संबंध नाही.  व्याकरण म्हणजे वाक्यात येणाऱ्या शब्दांचे गुणधर्म आणि त्यांचे एकमेकाशी नाते.
कट आणि पुट या शब्दांची व्युत्पत्ती शोधली तर त्यांची अशी स्पेलिंगे का होतात ते कदाचित समजेल. व्युत्पत्तीशास्त्र हे व्याकरणशास्त्रापेक्षा वेगळे शास्त्र आहे.
चपलेत पाय ज़ात नाही आणि पायात चप्पल ज़ात नाही ही दोन्ही वाक्ये एकाच अर्थाची आहेत. यांत व्याकरण कुठेच येत नाही. 'अंगात सदरा घालणे' असे म्हणायचा प्रघात आहे यापेक्षा यात जास्त विचार करायचे कारण नाही. प्रघात सहज़ाजसहजी बदलता येत नाही.  चपळ आणि अचपळ, धुंद आणि बेधुंद, परोक्ष आणि अपरोक्ष, ह्या शब्दांच्या जोड्या एकाच अर्थाच्या आहेत.  भाषेचे हेच वैशिष्ट्य असते, ती येण्यासाठी नुसते व्याकरण शिकून चालत नाही.  वाक्य बनवण्याचे प्रघात माहीत असावे लागतात.
राजाची बायको राजी होत नाही, राणीचा नवरा मात्र राणा असू शकतो. माशाची मादी माशी होत नाही आणि सशाची मादी सशी नसते, बापाची बायको बापी नसते आणि आईचा नवरा आया नसतो. पाहुणा आणि पाहुणी यांचे एकमेकांशी काहीही नाते नसू शकते. बायकोचा भाऊही मेहुणा आणि बहिणीचा नवराही. याला आपण काही करू शकत नाही. असले शब्द भाषेत असल्यामुळे काहीही बिघडत नसताना उगीच परंपरेने आलेले भाषिक प्रघात तसेच चालू ठेवण्यातच आपली संस्कृती आहे.--अद्वैतुल्लाखान